नाविन्यता आणि उद्योजकतेला मिळेल मोठ्या प्रमाणात चालना – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । मागील काही वर्षात आपला देश विकासविषयक विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे. देशामध्ये युवकांमधील नवनवीन संकल्पनांवर आधारीत स्टार्टअप्स, युनिकॉर्न्स यांना चालना देण्यात येत आहे. या क्षेत्रात योगदान देत असलेल्या युवक-युवतींनी आपल्या कल्पना, आपले कार्य भारत देशासाठी समर्पित करावे, यामुळे देशातील इतरही युवक-युवतींना पुढे येण्यास मदत होईल. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सच्या विकासासाठी राज्यात विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्यामधून नाविन्यता आणि उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात आलेल्या स्टार्टअप सप्ताह आणि स्टार्टअप यात्रेतील विजेत्यांना आज राजभवन येथे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी़ डॉ. रामास्वामी एन. आदी मान्यवर उपस्थित.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विविध क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. यामध्ये सर्वांचे योगदान आहे. मागील आठ वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रात मोठी आघाडी मिळवली आहे. यापुढील काळातही देशाला अधिक प्रगत बनविण्यासाठी सर्वांनी परिश्रम, दृढसंकल्प आणि आत्मविश्वासाने साथ द्यावी. देशातील युवक नवनवीन संकल्पना आणून यात योगदान देत आहेत, स्टार्टअप्स, युनिकॉर्न्सची निर्मिती करीत आहेत. या क्षेत्रामध्येही आता युवकांनी ‘युनिक’ काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे. देशात मागील वर्षभरात नव्याने सुरू झालेल्या ४२ युनिकॉर्नपैकी ११ युनिकॉर्न महाराष्ट्रातील आहेत. रजिस्टर्ड स्टार्टअप्समधील सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही २०१८ मध्ये राज्याचे स्वतंत्र स्टार्टअप धोरण आखले होते. यामुळे राज्यात स्टार्टअप्सच्या विकासासाठी इकोसिस्टीम तयार झाली. आपण देशाला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनविण्याचे ध्येय ठेवले आहे.  यामध्ये इनोवेशन्सचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, देशामध्ये आता 5G तंत्रज्ञान लागू झाले आहे. हे तंत्रज्ञान आपण काळाच्या खूप आधी स्वीकारले आहे. भविष्यात 6G तंत्रज्ञान स्वीकारणारा आपला भारत देश हा जगातील पहिला देश ठरेल. इंटरनेटचे जाळे आता देशातील गावोगावी आणि दुर्गम भागातही पोहोचले आहे. 5G तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रातील नवनवीन संकल्पना दुर्गम भागापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवता येतील. किंबहुना आपत्ती व्यवस्थापनासाठीही नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्स योगदान देऊ शकतील. शासनाच्या विमा विषयक विविध योजना आहेत. याचेही नियोजन करण्यासाठी कल्पक स्टार्टअपचा वापर करता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. स्टार्टअपविषयक कोणत्याही उपक्र, योजनेसाठी राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत भरीव अर्थसहाय्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

आयटीआयचे आधुनिकीकरण करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी युवकांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्य विकासाची सुरुवात केली. राज्यामध्येही त्यानंतर स्वतंत्र कौशल्य विकास विभाग सुरु करण्यात आला. स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील अगदी दुर्गम भागातील युवक-युवतींकडूनही स्टार्टअप्स विकसीत केले जात आहेत. नुकत्यात राबविण्यात आलेल्या स्टार्टअप यात्रेला राज्यातील सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांच्याकडील नवनवीन संकल्पनांचा शासनाच्या विविध विभागांच्या कामकाजामध्ये करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये कालानुरुप बदल करण्यात येत असून त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. आयटीआयमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना उद्योजकतेची जोड देणे, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे याअनुषंगाने बदल करण्यात येतील, असे श्री. लोढा यांनी सांगितले.

डिजीटल भारत, स्टार्टअप भारत आवश्यक – डॉ. माशेलकर  

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर म्हणाले की, देशात काही काळापुर्वी वर्षाला एक युनिकॉर्न तयार होत असे, आता आठवड्याला एक युनिकॉर्न तयार होतो आहे. डिजीटल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. आता आपण डिजीटल भारत, स्टार्टअप भारत याकडे वळणे गरजेचे आहे. देशातील युनिकॉर्नपैकी ५० टक्के युनिकॉर्न हे टू आणि थ्री टायर शहरांमधील आहेत. अकोला, अमरावती, दापोली यांसारख्या छोट्या शहरांमधूनही आता कल्पक स्टार्टअप्स पुढे येत आहेत. यापुढील काळात आपल्याला अधिक सर्वसमावेशक होऊन स्टार्टअप्सच्या विकासाला चालना देता येईल, असे त्यांनी सांगितले.

 ग्रामीण, निमशहरी भागातील इनोव्हेशन्सना चालना – प्रधान सचिव मनिषा वर्मा

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वर्मा म्हणाल्या की, राज्यात स्टार्टअप्सच्या विकासासाठी इकोसिस्टम तयार करण्यात येत आहे. कौशल्य विद्यापीठांच्या माध्यमातून तसेच इन्कुबेशन सेंटर्समार्फत स्टार्टअप्सना प्रोत्साहन तसेच विविध प्रकारचे सहकार्य देण्यात येत आहे. राज्यातील ग्रामीण, निमशहरी, दुर्गम भागातील नवसंकल्पनांना व्यासपीठ मिळावे, या भागातील स्टार्टअप्सनी पुढे यावे यासाठी स्टार्टअप यात्रासारख्या उपक्रमांचा चांगला उपयोग होत आहे. यामाध्यमातून राज्याच्या सर्वच भागातून स्टार्टअप्स पुढे येत आहेत. तळागाळातील इनोव्हेशन्सना चालना देण्यात येत आहे. कौशल्य विकास विभागामार्फत यापुढील काळातही विविध प्रभावी उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला स्विडनचे संपूर्ण सहकार्य – कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल

स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल म्हणाल्या की, स्विडन हे इनोव्हेशन्समधील जगातील एक प्रमुख आघाडीवरील राष्ट्र आहे. महाराष्ट्रात स्टार्टअप आणि उद्योजकतेच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत. महाराष्ट्रामध्ये या क्षेत्राच्या विकासाला खूप मोठा वाव आहे. यासाठी महाराष्ट्राला स्विडनचे संपूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!