
स्थैर्य, 15 फेब्रुवारी, सातारा :कोयनानगर परिसरात जखमी अवस्थेतील बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वन विभागाकडून काहीच उपाय योजना केली जात नसल्याने संतापाची भावना व्यक्त होत आहे. पुढच्या पायात लोखंडी तार अडकून गंभीर जखमी झालेला हा बिबट्या गेल्या काही दिवसांपासून कोयनानगर येथील चेंबरी या शासकीय विश्रामगृह रोडवर व कोयनानगर वसाहतीत गावाच्या हद्दीत फिरताना दिसत आहे.
जखमेच्या वेदनेमुळे बिबट्या अस्वस्थ असून त्याच्या हालचाली अधिक अनिश्चित बनल्या आहेत. वस्तीजवळ त्याचा वाढता वावर नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत असताना अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये भावना आहे. विशेषतः सकाळ-सायंकाळच्या वेळी असुरक्षिततेची शेतात जाणार्या नागरिकांना भीतीच्या छायेखाली वावर करावा लागत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार,बिबट्याच्या पायातील जखम गंभीर असून संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास बिबट्याची अवस्था अधिक बिघडून तो अधिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच वन्यप्राण्याच्या जीवाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी वन विभागाला तातडीने पथक पाठवून बिबट्याचा शोध घेण्याची आणि ट्रॅन्क्विलायझरच्या साहाय्याने त्याला पकडून तातडीने उपचार करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप प्रभावी कारवाई न झाल्याने वन विभागाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिस्थिती गंभीर बनत असताना कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हालचाल करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

