स्थैर्य , सातारा , दि.22: कृष्णा नगर येथील जया गणेश पाटील ( गजानन हौ सोसायटी ) या वृध्देचा खून अनैतिक संबधांतून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे . या प्रकरणी अनंत दाजीबा पेडणेकर वय 33 रा संभाजी नगर मूळ रा चंदगड कोल्हापूर या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे . आरोपीला आठ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली . अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यावेळी उपस्थित होते .बन्सल यांनी या तपासासंदर्भात माहिती देताना सांगितले की कृष्णा नगर येथील गजानन हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या जया गणेश पाटील यांचा दि १६ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता खून झाल्याचे उघडकीस झाले होते . पाटील यांचा मोबाईल सुद्धा गायब होता . सातारा शहर पोलीस , स्थानिक गुन्हे शाखा , सायबर विभाग यांनी संयुक्तरित्या पाच पथकाद्वारे या खूनाचा तपास सुरू केला . तांत्रिक विश्लेषण आणि काही धागेदोऱ्यांचे संदर्भ जुळवत साताऱ्यात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अनंत दाजीबा पेडणेकर पोलिसांनी अटक केली . त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला आठ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली .
तपास सूत्रांच्या संदर्भानुसार पेडणेकर हा साताऱ्यात एका हॉटेलमध्ये काम करतो . एका प्रवासादरम्यान त्याची व जया गणेश पाटील यांची ओळख झाली होती .आरोपी दोन तीन वेळा त्यांच्या घरी सुद्धा येऊन गेला होता . या ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले . खुनाच्या दिवशी उभयतांमध्ये याच कारणावरून वाद झाला आणि आरोपीने घरातील धारदार चाकूने पाटील यांच्या गळ्यावर वार केला . पोलिसांनी हे हत्यार जप्त केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सी एम मचले करत आहेत . पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण , शिवाजी भिसे, संदीप आवळे , गणेश घाडगे, गणेश भोंग, विशाल धुमाळ यांनी कारवाईत भाग घेतला.