स्थैर्य, सातारा, दि. २८ : नागठाणे (प्रतिनिधी) बोरगाव (ता.सातारा) येथील एका युवकाचा कोरोना तपासणी अहवाल पोजेटीव्ह आल्याने नागठाणे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तात्काळ बाधित सापडलेल्या परिसरपासून २५० मीटरचा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला. प्रशासनाने बाधिताच्य अति संपर्कात आलेल्या एकूण १५ जणांना कोरंटाईन केले असून ते बाधित नागठाणेसह परिसरातील दवाखान्यात गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
बोरगाव पोलीस ठाण्याच्या मागील बाजूसच बाधित युवक आपल्या नातेवाईकांकडे राहावयास होता. तो येथीलच एका खाजगी संस्थेत पिकअप वर चालक म्हणून कामाला होता. संस्थेचे साहित्य घेऊन तो महाबळेश्वर, महाड (कोकण) येथे डिलीव्हरी साठी जात होता. काही दिवसांपूर्वी कणकणी व खोकला असल्याने प्रथम शेंद्रे येथे उपचारासाठी गेला होता. त्यानंतर तो गावातीलच खाजगी दवाखान्यातही उपचारासाठी गेला. मात्र प्रकृती न सुधारल्याने नागठाणे येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. तेथे तीन दिवस उपचार करूनही काहीच फरक न पडल्याने त्याला शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या स्वेब काढून तपासणीसाठी पाठविण्यात आला. शनिवारी रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉसिटीव्ह आला.
बोरगावच्या युवक कोरोना पॉसिटीव्ह असल्याची माहिती गावात कळताच एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तात्काळ बोरगाव येथे धाव घेत बाधिताच्या घरापासूनचा २५० मिटर परीघ क्षेत्र मायक्रो कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर केला. त्यामध्ये बोरगाव पोलीस ठाण्याचाही समावेश झाला आहे. आरोग्य विभागाने तात्काळ या परिसरातील लोकांची तपासणी मोहीम हाती घेतली. बाधिताच्या घरातील व शेजारी अतिनिकट सहवासातील १५ जणांना तात्काळ कोरंटाईन करून त्यांना पानमळेवाडी येथे कोरंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले. तर बाधिताच्या संपर्कात आलेल्या शेंद्रे, बोरगाव व नागठाणे येथील डॉक्टर व त्यांच्या कुटुंबियांचे स्वेब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. कांबळे, डॉ.पराग जोशी, डॉ. स्वनिल धर्माधिकारी, मंडलाधिकारी नितीन घोरपडे, तलाठी अशोक साबळे, कोतवाल महेश तांबोळी, सरपंच सुनीता बनकर, उपसरपंच नितीन घाडगे व ग्रामसेवक निकम यांनी भेट देऊन पाहणी केली.
सासपडेकरांनीटाकला सुटकेचा निश्वाससासपडे (ता.सातारा) येथे दुबई येथून आलेल्या एकाचा रविवार (ता.28) रोजी कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यामुळे सासपडे परिसरात एकच खळबळ उडाली होती. परंतु सदर व्यक्ती हा याठिकाणी आलाच नसल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती दुबई येथून आला होता. पण सासपडे येथे न येता सातारा येथील एका हॉटेल मध्ये कॉरनटाइन केलं होतं तिथूनच त्यांना त्रास झाल्याने उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रूग्णालयात दाखल झाला.