स्थैर्य, मुंबई, दि. 21 : कमी चाचण्यांमुळेच सातत्याने कोरोना संसर्ग वाढत असून, मृत्यूचे प्रमाण सुद्धा अधिक आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कोरोना चाचण्या, त्यातून येणारे पॉझिटिव्ह रूग्ण, दैनंदिन संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण याचा मुंबई आणि महाराष्ट्राचा आलेख त्यांनी मांडला आहे. दिल्लीत केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर आणि तेथे मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्यानंतर तेथे रूग्णसंख्या, मृत्यूचे प्रमाण आणि संसर्गाचा दैनंदिन दर याचे कमी होत असलेले प्रमाण हेही त्यांनी 8 जूनपासूनची दैनंदिन स्थिती दाखवित स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की, कोरोना चाचण्या सातत्याने कमी करण्यामुळे आपण काय कमाविले आणि काय गमाविले? महाराष्ट्रातील संसर्गाचा दर अगदी प्रारंभी जो 6 ते 7 टक्के होता, तो 8 जूनपर्यंत 17-18 टक्क्यांवर आला आणि आता 23 ते 24 टक्के. अर्थात 100 चाचण्यांमधून 24 जणांना कोरोनाचे निदान होते. मुंबईचा संसर्गाचा दर सातत्याने 21 ते 27 टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. चाचण्यांची संख्या अतिशय कमी. 1 ते 19 जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी केवळ 5500 चाचण्या दररोज होत आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाबळींची संख्या दररोज सरासरी तेवढीच राहत आहे. नवी दिल्लीतील स्थितीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतरची संसर्गाचा दर 30 ते 35 टक्क्यांहून आता 6 टक्क्यांवर आलेला आहे आणि कोरोना बळींच्या संख्येतही घट झाली आहे. असे असले तरी कोरोना चाचण्यांची संख्या तरीही दररोज कायम ठेवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात चाचण्यांना दुसरा कोणताही पर्याय नाही. कोरोनावर मात करण्याचा, रूग्णसंख्या कमी करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय म्हणजे अधिकाधिक चाचण्या, संशयितांचे विलगीकरण आणि इतरांची सुरक्षा.