उद्योग विश्वाने निर्बंधांचे तंतोतंत पालन करण्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १५: ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून शासनाने जारी केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि उद्योग विश्वाने राज्य शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

वसई – विरार परिसरातील तीन औद्योगिक संघटनांचा वतीने आयोजित चर्चासत्रात श्री. देसाई बोलत होते. यावेळी वसई विरार औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष अनिल आंबर्डेकर, गोवालिस संघटनेचे सी. ए. अँटो, वसई तालुका औद्योगिक संघटनेचे अभय जिन्सिवाले, आशिष आपटे यांच्यासह यावेळी उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर उपस्थित होते.

वसई पट्ट्यातील उद्योजक निर्यातीत आघाडीवर आहेत. शासनाने निर्यात प्रधान उद्योग सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे तसेच अत्यावश्यक सेवा, अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग, निरंतर प्रक्रिया करणारे उद्योग या साऱ्यांना उत्पादन सुरु ठेवण्याची संमती दिली आहे. उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे देसाई म्हणाले.

वसई-विरार परिसरातील उद्योग संघटनांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी, कोविड चाचण्या, रुग्णालय आदी सुविधा सज्ज ठेवल्याबद्दल श्री. देसाई यांनी संबंधितांचे कौतुक केले.

उद्योगांमध्ये 20 ते 40 वयोगटातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने काम करतो. लसीकरणासाठी 45 वर्षे वयाची अट आहे. ती अट शिथिल करून या 20 ते 40 वयोगटातील कामगारांचा लसीकरणासाठी समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

कोविडची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुढील पंधरा दिवसांत रुग्णवाढीचा वेग वाढण्याची शक्यता आहे. खाटांची संख्या कमी पडत आहे. ऑक्सिजनची गरज वाढली आहे. परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, यासाठी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग विश्वाने या लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन श्री. देसाई यांनी केले.

कोरोना संकटामुळे राज्यशासन दुहेरी संकटात आहे. या संकट काळात कामगारांच्या हिताचे रक्षण करावे व कामगार कपात टाळावी असे आवाहन श्री. देसाई यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!