टोकियो, दि. 28 : आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे चीनविरोधात त्याच्या शेजारच्या देशांमध्ये रोष निर्माण होत आहे. लडाखमध्ये भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यामुळे चीनसोबत तणाव निर्माण झाला आहे तर एका बेटावरून जपान आणि चीनमध्येही तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि जपानच्या नौदलाने हिंदी महासागरात संयुक्त सराव केला.
जपानच्या नौदलाने या सरावाची माहिती दिली. जपानच्या मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्सच्या जेएस कशिमा आणि जेएस शिमायुकी यांनी भारतीय नौदलाच्या आयएनएस राणा आणि आयएनएस कुलीसश यांनी या संयुक्त सरावात सहभाग घेतला. या सरावामुळे जपान मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स आणि भारतीय नौदलात सहकार्य वाढणार आहे.
वृत्तानुसार जपानची विनाशिका युद्धनौका कागाला दक्षिण जपानमधील ओकिनावा बेटाजवळ 24 समुद्र मैल अंतरामध्ये एक पाणबुडी आढळली. त्यानंतर जपानच्या नौदलाने पेट्रोलिंग एअरक्राफ्टद्वारे चीनच्या पाणबुडीला जपानच्या हद्दीतून हुसकावून लावले. याआधी 2018 मध्ये जपानने आपल्या समुद्राच्या हद्दीत एका चिनी पाणबुडीला पकडले होते.
चीनने पूर्व चीन समुद्रातील बेटावर आपला दावा सांगितला आहे. सध्या हे बेट जपानच्या ताब्यात असून सेनकाकू आणि चीनमध्ये डियाओस या नावाने ओळखले जाते. या बेटांचा ताबा 1972 पासून जपानकडे आहे. हे बेट आपल्या हद्दीत येत असल्याचा दावा चीन करत असून जपानने या बेटावरील दावा सोडण्याची मागणी केली आहे. या बेटासाठी जपानवर सैनिकी कारवाई करण्याची धमकी चीनने दिली आहे. सध्या या बेटांचे संरक्षण जपानचे नौदल करत आहे. चीनने जर या बेटांवर ताबा मिळवण्यासाठी लष्करी कारवाई केल्यास युद्ध होण्याची दाट शक्यता आहे.
आशियात या देशांसोबत चीनचा वाद
आशिया खंडात चीनचा शेजारच्या देशांसोबत वाद सुरू आहे. चीन या आक्रमक विस्तारवादी धोरणांचा भारताला सर्वाधिक धोका आहे. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. त्याशिवाय जपानसोबतही बेटाच्या दाव्यावरून तणाव सुरू आहे. चीनकडून तैवानलाही धोका आहे. तैवानवरही हल्ला करण्याची धमकी चीनने यापूर्वीच दिली आहे. त्याशिवाय दक्षिण चीन समुद्राच्या हद्दीवरून इतर देशांसोबत चीनचा वाद आहे. फिलिपाइन्स, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम या शेजारी देशांसोबत चीनचा वाद सुरू आहे. तैवानला चीनकडून सातत्याने देण्यात येत असलेली धमकी आणि दक्षिण चीन समुद्रात चीन घेत असलेली आक्रमक भूमिका यामुळे अमेरिकेनेही आपली युद्धनौका या भागात तैनात केली आहे.