भारतीय रेल्वे टाकणार कात; जनरल डब्यांसह संपूर्ण गाडी एसी होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१०: भारतीय रेल्वेमध्ये आजवर वेळोवेळी प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा रेल्वे कात टाकणार असून आणखी एक महत्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, आता कमी खर्चात नागरिकांना एसी डब्यातून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्हणजेच रेल्वेने जनरल डब्यांसह सर्व डबे एसी करण्याची योजना आखली आहे.

रेल्वेच्या नव्या योजनेनुसार, स्लीपर कोच आणि बिगर आरक्षित श्रेणीच्या डब्ब्यांना एसी कोचमध्ये बदलण्यात येणार आहे. याद्वारे रेल्वे देशभरात एसी गाड्या आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे प्रवाशांना खिशावरील अतिरिक्त भाराशिवाय चांगला आणि आरामदायी प्रवास उपलब्ध होऊ शकतो. अधिका-यांच्या माहितीनुसार, अपग्रेड करण्यात आलेल्या स्लीपर कोचला इकॉनॉमिकल एसी ३-टायर संबोधलं जाईल. 

सुत्रांच्या माहितीनुसार, कापूरथला येथील रेल्वे कोच तयार करणा-या फॅक्टरीकडे स्लीपर कोचला एसी कोचमध्ये रुपांतरीत करण्याचा नमुना तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिकल एसी ३-टायरमध्ये ७२ बर्थच्या ऐवजी ८३ बर्थ असतील. सुरुवातीला या कोचना एसी ३-टायर टुरिस्ट क्लास असंही म्हटलं जाईल. एका अधिका-याच्या माहितीनुसार, एसी ३-टायरचं हे स्वस्तातील कोचच रुप असेल. 

पहिल्या टप्प्यात याप्रकारच्या २३० डब्ब्यांची निर्मिती केली जाईल. प्रत्येक कोचला बनवायला २.८ ते ३ कोटी रुपयांचा अंदाजे खर्च येईल. हा खर्च एसी ३-टायर बनवण्याच्या खचार्पेक्षा १० टक्के जास्त आहे. मात्र, जास्त बर्थ आणि मागणीमुळे रेल्वेला इकॉनॉमिकल एसी ३-टायरपासून चांगल्या महसुलाची अपेक्षा आहे. 


जनरल डब्यांची आसन क्षमता वाढवणार 

त्याशिवाय बिगर आरक्षित जनरल क्लासच्या डब्यांना देखील १०० सीटच्या एसी डब्ब्यांमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. यासाठी डिझाईनला अंतिम स्वरुप दिलं जात आहे. या प्रकल्पावर काम करणा-या एका अधिका-याने सांगितले की, सुरुवातीच्या डिझाईनमध्ये प्रत्येक जनरल डब्यात १०५ आसनांसाठी जागा बनवली जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!