स्थैर्य, अकलूज दि.३ : गेल्या पाच महिन्यांपासून चीनमध्ये अडकलेल्या 23 भारतीय अधिकारी व कर्मचार्यांना दिलासा मिळाला असून ते येत्या आठ दिवसात मायदेशी परततील, असा विश्वास आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला .
याबाबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी या मुंबई येथील भारतीय मर्चट नेव्ही कंपनीचे जहाज ऑस्ट्रेलिया येथून कोळशाचा पुरवठा करण्यासाठी चीन देशातील बंदरापाशी गेल्यानंतर चीन सरकारने कोळसा स्विकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे तब्बल गेल्या 5 महिन्यांपासून हे जहाज व या जहाजावर कार्यरत असलेले भारतातील 23 अधिकारी व कर्मचारी अडकून पडलेले होते. यात पंढरपूरचे सुपूत्र विरेंद्रसिंह भोसले हे देखील होते. त्यांच्या जवळचा औषध – गोळ्यांचा साठा संपत आलेला असल्याने अधिकारी व कर्मचार्यांची मानसिकता देखील ढासळत चाललेली होती. या सर्वांची सुटका करण्यासाठी वीरशैव सभेचे पंढरपूर शहराध्यक्ष विशाल आर्वे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून या सर्व अधिकारी व कर्मचार्यांची सोडवणूक करावी अशी विनंती केली होती .
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जी 20,जी 7 चे भारतीय दूत खासदार सुरेश प्रभू यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत संबंधितांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. यावर तात्काळ सुरेश प्रभू यांनी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर संपर्क साधत सूत्रे हलविली होती. काही संबंधित अधिकार्यांशीही आमदार रणजितसिंहानी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. चार दिवस यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि शेवटी केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून जहाज कंपनीचे अधिकारी यांनी त्वरीत कागदपत्रे घेवून चीनमध्ये जात आपले जहाज व जहाजेवर कार्यरत असलेले 23 अधिकारी, कर्मचारी यांना भारतात घेवून येण्याचा आदेश लवकरच जारी होणार असल्याचे कळविले होते. भारतीय अधिकारी, कर्मचारी यांची आता अधिक गैरसोय होऊ नये याकरिता चीनमधील भारतीय दूतावासात त्यांना हलवण्याची देखील सोय करण्यात आलेली होती.
नुकतेच खासदार सुरेश प्रभू यांचे आमदार मोहिते पाटील यांना पत्र आले असून यामध्ये चीन दुतावासाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यानुसार 23 भारतीय अधिकारी व कर्मचारी यांची येत्या आठवडाभरात पाठवण केली जाणार असून ते आठवडाभरात मायदेशी परततील असे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .