
दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या किसन वीर कारखाना बचाव पॅनेल व कारखान्याचे विद्यमान चेअरमन मदन भोसले याचा शेतकरी विकास पॅनल याच्या मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रचाराची जोरदार रणधुमाळी उडाली होती. गेली एकोणीस वर्षे कारखान्यावर सत्ता गाजविणाऱ्या माजी आमदार मदन भोसले यांच्या वर्चस्वाला धक्का देत आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनलने सर्व २१ जागावर निर्विवाद वर्चस्व मिळविले.
किसन वीर साखर कारखान्यासाठी ३ मे रोजी ६९.३१ टक्के मतदान झाले होते. ५ मे रोजी श्रीनिवास मंगल कार्यालयात झालेल्या मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासून ऊस उत्पादक गटातून व राखीव गट आणि सोसायटी मतदार संघात मकरंद पाटील यांच्या किसन वीर कारखाना बचाव पॅनेलने आघाडी घेतली होती. कवठे-खंडाळा व भुईंज या सोसायटी गटात आमदार मकरंद पाटील यांच्या किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. तर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांचा शेतकरी विकास पॅनेल मात्र पिछाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत गेले. कवठे-खंडाळा गटात नितीन पाटील २२२४४ मते घेऊन आघाडी घेतली तर भुईंज गटात माजी आमदार मदनदादा भोसले हे १२९७० मतांसहित पिछाडीवर राहिले. दोन दशकाच्या कालावधीनंतर आमदार मकरंद पाटील गटाने किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीत उडी घेतली. यंदाच्या कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनल मध्ये थेट लढत झाली. दोन्ही गटांनी आपणच निवडणूक जिंकणार असल्याचा दावा केला होता.
पहिल्या फेरीतील मतमोजणीचे निकालामध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलने कवठे-खंडाळा गटात व भुईंज वाई बावधन जावली सातारा कोरेगाव ऊस उत्पादक गटात आघाडी घेतली. मतमोजणीत आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत कारखान्याची सत्ता मिळवली.