दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण नगर परिषदेच्या सफाई कर्मचार्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले आहे. सफाई कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत दि. १८ एप्रिल रोजी नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतल्याने हे उपोषण मागे घेतल्याचे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस फलटण शहर यांनी सांगितले आहे. या बैठकीस नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. संजय गायकवाड, अधिकारी, कर्मचारी व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नगरपालिकेच्या सफाई कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सफाई कर्मचार्यांच्या समस्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी मांडल्या. यावेळी झालेल्या निर्णयात सफाई कर्मचार्यांनी केलेल्या मागण्यांबाबत मुख्याधिकार्यांनी सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे सफाई कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले आहे व बेमुदत सुरू केलेले उपोषण मागे घेतल्याने संघटनेने जाहीर केले आहे.