
स्थैर्य, फलटण, दि. २४ सप्टेंबर : वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने, काल, मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून धरणातून नीरा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. सध्या धरणातून ७८३७ क्युसेक्स इतक्या वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.
पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आल्याने नीरा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदीपात्रात उतरू नये किंवा आपली जनावरे सोडू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धरणातील पाण्याची येणारी आवक आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेता, नदीपात्रातील विसर्गात पुन्हा वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगावी, असेही पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.