स्थैर्य, फलटण : शहरामध्ये व तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वाढीव रकमेची वीज बिले दिल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उमटली आहे. आधीच करोना या आजाराने नागरिक हैराण झाले असताना वीज बिलाची एकदम इतकी रक्कम भरायची कशी ? असा सवाल नागरिकांना पडला आहे. लॉकङाऊन मुळे एप्रिल महिन्याची वीज बिले अव्वाच्या सव्वा आकारली आहेत. विजेचा वापर न करता नागरिकांनी बिले आल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या महिन्यात बील जास्त आल्याने महिन्याचे अर्थिक बजेट कसे चालवायचे ? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. तुटपूंजा वेतन असलेल्या नागरिकांना घर चालवायचे की विजेचे भरमसाठ बील भरायचे याचीही चिंता लागून राहिली आहे. वीज बिलाचे रिडींग घेण्यासाठी कुणी व्यक्ती आली नाही. तरीही लॉकडाऊनच्या तिनही महिन्याची वीज बिले चालू महिन्याच्या बीलात अंतर्भूत करून आली आहेत. त्यामुळे अनेकांना अर्थिक फटका बसला आहे.वाढीव वीज बिलांबाबत महावितरणकडे तक्रार केली असता ‘आधी बील भरा, नंतर बोलू’ अशी उत्तरे दिली जात आहे.
फलटण तालुक्यात सर्वसामान्य व हातावरचे पोट असणारे नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यातील अनेकांना तुटपूंजा पगार आहे. सहा हजार पगार असल्यास दोन ते अडीच हजार रुपये बील आल्यावर घरात खायचे काय ? असा पश्न पडत आहे. त्यात काही वीज ग्राहकांना सिक्युरीटी डिपॉझिट भरण्याची दुसरी बिले देखील आली आहेत. त्यामुळे या महिन्यात अनेकांना दोन बिलांचा भरणा करावा लागणार आहे कि काय असा सवालही उपस्थित राहत आहे. या बिलांची आकारणी कशी केली, याबाबत महावितरणचे कर्मचारी समाधानकारक उत्तरे देण्याची तसदी देखील घेतांना दिसत नाही. महावितरणच्या वीज बीलांबाबत तक्रारी येत आहेत. या प्रकरणी पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, वाढीव बिले कमी करून द्यावीत आणि पुन्हा वाढीव बीले येणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणात नागरिकांमधून होत आहे.