दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२३ । सातारा । जिल्ह्यात एच.आय.व्ही. तपासणीचे प्रमाण वाढवावे, तसेच रुग्णांची निश्चित माहिती मिळून त्यांना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने खासगी रुग्णालयांशी समन्वय साधावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या बैठक सभागृहात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय एड्स नियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. समीर टकले, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजय तावरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही यांची दक्षता घ्यावी अशा सूचना करून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी म्हणाले, एच.आय.व्ही. तपासणीची कीट राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून खरेदी करण्यासाठी प्रस्ताव द्यावा. गरोदर मातांमधील एच.आय.व्हीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. खासगी रुग्णालयांशी समन्वयाने माहिती मिळाल्यास त्याची मदत चांगले व लवकर उपचार देण्यात होईल.
यावेळी जिल्ह्यातील एच.आय.व्ही रुग्णांची माहिती, सद्यस्थिती, देण्यात येणारे उपचार व नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
तंबाखू मुक्त शाळा कार्यक्रमाचा वेग वाढवा
दरम्यान यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची बैठकही घेण्यात आली. त्यावेळी तंबाखू मुक्त शाळा कार्यक्रमाचा वेग वाढवण्याच्या सूचना देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी म्हणाले, याबाबत करण्यात येत असलेली दंडात्मक कारवाई वाढवावी. तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती व कर्क रोग तपासणी यासाठी शिबीर, सप्ताहाचे आयोजन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरही तोंडाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी करण्यात यावी. तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थांची विक्री शाळा महाविद्यालयांजवळ होणार नाही यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना केल्या.