कुलाबा, ठाणे, अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएस, एमडी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० जानेवारी २०२२ । मुंबई । राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली आहे. या परवानगीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने देखील प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

मुंबईच्या आयएनएचएस अश्विनी कुलाबा येथील इन्स्टिट्यूट ऑफ नेवल मेडिसिन या संस्थेमध्ये एम.डी. (मरीन मेडिसीन) हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतो, या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता दोन जागांनी सुरु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एमबीबीएस या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 80 वरुन 100 करण्यास मान्यता दिली आहे. अमरावतीच्या शिवाजीनगर येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम.डी. (पेडियाट्रिक्स) हा वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम 2 विद्यार्थी प्रवेश क्षमतेने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयांमधील मान्यता मिळालेल्या वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार राहणार आहे. सदर प्रवेश क्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या सर्व अभ्यासक्रमांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!