स्थैर्य, नवी दिल्ली, दि.४: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आयकर विभागाकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्या प्रकरणी आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रा यांना नोटीस पाठवली होती. मात्र, ते आयकर कार्यालयात चौकशीसाठी आले नव्हते. त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारीच वाड्रा यांच्या घरी दाखल झाले आहेत. आयकर विभागासोबतच अंमलबजावणी संचालनालय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वाड्राविरोधात तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रॉबर्ट वाड्रा यांच्यावर बिकानेर आणि फरीदाबादमधील जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. परंतू, अधिकारी वाड्रा यांची कोणत्या प्रकरणात चौकशी करत आहेत, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, वाड्रा यांच्यावर लंडनच्या ब्रायनस्टन स्क्वेअरमध्ये चुकीच्या पद्धतीने 19 लाख पाउंड किमतीचे घर खरेदी केल्याचा आरोप आहे. वाड्रा सध्या अंतरिम जामीनावर बाहेर आहेत.
यापूर्वी या प्रकरणात वाड्रा यांचे सहकारी मनोज अरोराला कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. ईडीने सांगितल्यानुसार, आयकर विभाग फरार शास्त्र व्यापारी संजय भंडारीविरोधात काळ्या पैशाचा कायदा आणि कर कायद्यांतर्गत दाखल असलेल्या खटल्यांची चौकशी करत होते. यादरम्यान, अरोराच्या भूमिकेवर आयकर विभागाला संशय आला. यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाड्रा यांना फायदा मिळून देण्यासाठी सौदा केला
ईडीचा आरोप आहे की, लंडनमध्ये भंडारीने 19 लाख पाउंडमध्ये संपत्ती खरेदी केली होती. नंतर त्या घराच्या डागडुजीसाठी 65,900 पाउंड खर्च केल्यानंतर 2010 मध्ये ही संपत्ती त्याच किमतीत वाड्रा यांना विकली. यावरुन हे स्पष्ट झाले की, भंडारी या संपत्तीचा मुख्य मालक नव्हता. त्याने वाड्रा यांना फायदा मिळून देण्यासाठी हा सौदा केला. आरोप आहे की, वाड्रा यांचे स्काईलाइट हॉस्पिटॅलिटीचे कर्मचारी अरोरा यांची सौद्यात महत्वाची भूमिका आहे.