योजनेत शेतकऱ्यांना 2 लाख 66 हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण
स्थैर्य, महाबळेश्वर, दि. 11 : महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला असून या योजनेत शेतकऱयांना 2 लाख 66 हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आले आहे. करोना मुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आलेल्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात अंदाजे अडीच ते तीन हजार एकर पेक्षा अधिकचे क्षेत्र स्ट्रॉबेरीच्या पिकाखाली येते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. मागील हंगामात लागवडीपूर्वी व लागवडीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे रोपांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते त्यानंतर कमी जास्त थंडी, वन्यप्राण्यांचा उच्छाद व हंगामाच्या अंतिम टप्प्यात आलेल्या या करोना च्या महासंकटामुळे तर संपूर्ण स्ट्रॉबेरी हंगाम जवळपास वाया गेला व करोडोंचे नुकसानीस सामोरे जावे लागले स्ट्रॉबेरीचे मदरप्लांट हे परदेशातून येत असल्याने या पिकांस इतर पिकांच्या तुलनेत जवळपास दुप्पट भांडवल खर्च होते. त्यातच स्ट्रॉबेरीचे आयुष्यमान कमी असल्याने त्याची वेळेत विक्री करणे गरजेचे असते. त्यातच इतर संकटे आली, की शेतकऱयांचे अर्थकारण बिघडून कर्जबाजारीपणा वाढतो यासाठी शेतकऱयांकडून स्ट्रॉबेरीचा समावेश फळपीक विमा योजनेत करण्याची मागणी होत होती.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खासगी दौऱयासाठी आले असता त्यांनी राजभवन येथील बैठकीत स्ट्रॉबेरी उत्पादकांनी भेट घेतली त्यावेळी स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोचे अध्यक्ष बाळासाहेब भिलारे, पंचायत समिती उपसभापती संजुबाबा गायकवाड आदींकडून शेतकऱयांच्या समस्या व व्यथा जाणून घेतल्या तसेच देशात प्रसिद्ध असलेल्या या स्ट्रॉबेरीसाठी संशोधन केंद्राची गरज असल्याची मागणी केली तसेच या स्ट्रॉबेरी पिकास विमा संरक्षण मिळावे, अशी विनंती देखील त्यांना केली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्ट्रॉबेरीचा प्रस्ताव सादर करण्याच्या कृषी विभागास सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार कृषी विभागाने पाठविलेल्या प्रस्तावास मान्यता दिल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश पीक विमा योजनेत करण्यात आला असून या योजनेत कर्जदार, बिगर कर्जदार शेतकयांना सहभागी होता येणार आहे. ज्यांना विमा उतरावयाचा आहे त्यांनी त्या शेताचा सातबारा, खातेउतारा, राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा बॅंकेत खाते आहे त्या ठिकाणी हप्ता भरावयाचा आहे. तसेच सुविधा केंद्र, विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून विमा हप्ता भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या योजनेत स्ट्रॉबेरी पिकांस हेक्टरी दोन लाख 66 हजारांपर्यंत विमा संरक्षण मिळणार असून यामध्ये कमी तापमान होणे, आर्द्रता कमी होणे, अवेळी पावसाने नुकसान झाल्यास हेक्टरी दोन लाख, तर जानेवारी ते एप्रिल यामध्ये गारपिठीने स्ट्रॉबेरीचे नुकसान झाल्यास 66 हजार रुपये, तसेच या दोन्ही संकटाने नुकसान झाल्यास हेक्टरी दोन लाख 66 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. शेतकयांचा विमा हिस्सा म्हणून हेक्टरी दहा हजार तर शासनाचा हिस्सा 96 हजार भरावा लागणार आहे.