स्थैर्य, फलटण : मराठा समाजाला सरसकट ओ. बी. सी. मध्ये समावेश करा म्हणून मराठा सेवा संघ व संभाजी बिग्रेड गेले काही वर्ष मागणी करीत आहे. मागील काही काळामध्ये घटनेच्या १५/४ व १६/४ कलमा अंतर्गत मराठा समाजाला शिक्षण व नोकरी यामध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या सवलतीचा लाभ घेत राहणे व मराठा समाजाचा ओ. बी. सी. समावेशा साठी लढत राहणे या प्रकारची भूमिका संभाजी ब्रिगेड ने घेतलेली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर घटना पिठाची मागणी करण्यात आली. त्यावेळीही संभाजी ब्रिगेडने हा धोका होण्याची शक्यता व्यक्त केली होती. आरक्षण लढ्यात सहभागी झालेल्या समाज बांधव व संघटनांना यानिमित्ताने पुनश्च एकदा विनंती करण्यात येत आहे की आपण नैराश्यात न जाता गायकवाड आयोगाचा अहवालाचा आधार घेत महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करून ओबीसी समावेशा साठी आग्रह धरणे हे योग्य राहील असे संभाजी बिग्रेडचे सातारा जिल्ह्याध्यक्ष विशाल शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे.