दैनिक स्थैर्य | दि. १५ जून २०२४ | फलटण |
गेल्या काही दिवसात फलटण शहर आणि सातारा जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ पुरूष नागरिकांना एकांत ठिकाणी गाठून काही गुन्हेगार हे पोलीस असल्याचे आणि नाकाबंदी सुरू आहे, चोर आलेले आहेत वगैरे कारणे सांगून अंगावरील दागिने काढून रुमालात, खिशात ठेवा असे म्हणून ते दागिने चोरून नेत असल्याच्या घटना घडत आहेत. अशा लोकांना बळी न पडण्याचे आवाहन फलटण शहर पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
हे गुन्हेगार वेगात जाणार्या मोटारसायकलवर हेल्मेट घालून येतात आणि काहीवेळा त्यांच्याच एका साथीदाराची झडती घेतात आणि ज्येष्ठ नागरिकांना फसवतात, असे आढळून आले आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस आहोत, असे सांगून दागिने काढून ठेवा, वगैरे रस्त्यात कोणी अडवून सांगू लागले तर विश्वास ठेवू नये, अशा गुन्हेगारांपासून दक्ष रहावे, असे पोलिसांनी सांगितले आहे.