
स्थैर्य, सातारा, दि.१९: शेत विकून पैसे देत नसल्याच्या कारणावरून दरजाई, ता. खटाव येथे मुलाने मित्राच्या साह्याने स्वतःच्या पित्याचा खून करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांनी संयुक्तरित्या तपास करून 24 तासात संशयितांना अटक केली आहे. संपत गुलाब सत्रे वय 55 असे मयताचे नाव आहे. मयताचा मुलगा पवन संपत सत्रे वय 28 रा. दरजाई, सौरभ अशोक कदम वय 23, युवराज मोहन जाधव वय 35 दोघे रा. वडूज ता. खटाव यांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, 17 रोजी दरजाई येथील शेतकरी संपत गुलाब सत्रे वय 55 शेतातील काम संपवून शेतातील पायवाटेने घरी जात होते. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन डोक्यात वार करुन त्यांचा निर्जन स्थळी खून करण्यात आला होता. अज्ञात आरोपींनी काहीही धागेदोरे मागे न सोडता घटनास्थळावरुन पोबारा केलेला होता. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केलेली होती. दुसर्या दिवशी मयताचा अंत्यविधी करण्यात आला तरी देखील आरोपींचा थांगपत्ता लागलेला नव्हता. त्यामुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. या गुन्हयाचा तपास कोरेगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि विश्वजित घोडके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. किशोर धुमाळ व सपोनि आनंदसिंग साबळे संयुक्तरीत्या तपास करत होते.
याप्रकरणी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दरजाई व आजुबाजुच्या परिसरातील आपल्या खबर्यांकडून मृत संपत गुलाब सत्रे यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी तपासून मयताचा मुलगा पवन सत्रे यास ताब्यात घेऊन बारकाईने चौकशी केली. यावेळी वडील शेत विकुन पैसे देत नसल्याच्या कारणावरुन आपले मित्र सौरभ कदम व युवराज यांच्या मदतीने वडीलांचा शेतातून घरी जात असताना सायंकाळी 07.30 वा. सुमारास डोक्यात लाकडी दांडके मारून खून केला आहे. तसेच खुनानंतर वडील घसरुन पडुन जखम झाली व त्यामुळे ते मयत झाले असे भासविण्यासाठी त्यांचे डोक्याचे खाली दगड ठेवण्यात आलेला होता. सदर तपास पथकाने आरोपी सौरभ अशोक कदम यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे. सदर खुनाचा गुन्हा घडलेपासून अवघ्या 24 तासात गुन्हयाची उकल करण्यात व गुन्हयातील आरोपींना जेरबंद करण्यास संयुक्त तपास पथकाने यश मिळविले आहे. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, आनंदसिंग साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे-पाटील, सहा.फौजदार तानाजी माने, पोहवा सुधीर बनकर, पो. ना. अर्जुन शिरतोडे, पो. कॉ. मयूर देशमुख, संकेत निकम, चालक संजय जाधव व पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहा. फौजदार आनंदराव जगताप पोहवा चंद्रहार खाडे, सचिन खाडे, आनंदराव गमरे, पुष्कर जाधव, सचिन जगताप, सचिन माने, गणेश मुंढे, इम्तियाज मुल्ला, सुनिल आबदागिरी यांनी केली.