रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी दांडेघर येथील घटना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, महाबळेश्‍वर, दि.०१: दांडेघर (ता. महाबळेश्‍वर) येथील सौ. वासंती अरुण कळंबे (50) नावाची महिला रानडुकराच्या हल्लात गंभीर जखमी झाली आहे. घराजवळील शेतात रानडुकराने हल्ला केल्याने त्यांच्या डोक्यात तीन टाके पडले असून उजव्या पायाला जखम झाली आहे. त्यांच्यावर वाई येथील गितांजली रुग्णालयात उपचार करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, दांडेघर गावानजीक शेरबागेजवळ ईशवार या शिवारात 29 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वासंतीबाई भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कळपातून वेगळ्या झालेल्या एका रानडुक्कराने त्यांना जोरात धडक दिली. रानडुक्कराच्या हल्ल्याचा आवाज आल्याने जवळच असणार्‍या सुशांत कळंबे यांनी धावत जाऊन पाहिले असता वासंतीबाई जखमी अवस्थेत खाली पडल्या होत्या. सुशांत यांनी इतर ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना मुख्य रस्त्यावर आणले. तातडीने त्यांना पाचगणी येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता त्यांना वाई येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, रानटी डुकराने हैदोस घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाबळेश्‍वर तालुक्याच्या पूर्व भागात रानडुकरांचा वावर वाढला आहे. रानडुक्करांच्या सततच्या त्रासाने शेतकर्‍यांनी आपली शेती पडीक ठेवली आहे. आतातर गावाजळ येऊन नागरिकांवर हल्ला होत असेल तर वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.


Back to top button
Don`t copy text!