दैनिक स्थैर्य । दि. ३१ मार्च २०२३ । सातारा । महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जातो. सातारा जिल्ह्यात या योजनेंतर्गत 1 लाख 77 हजार 165 खात्यांवर 628 कोटी 31 लाख रुपयांचा प्रोत्साहनभर लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकूण 4 लाख 5 हजार 280 खाती नोंदणीकृत झाली आहेत. त्यापैकी 2 लाख 17 हजार 548 खात्यांना सहकार विभागाने विशिष्ठ खाती क्रमांक दिली आहेत. यामध्ये 2 लाख 14 हजार 816 खात्यांचे आधारप्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर 2 हजार 723 खात्यांचे आधार प्रमाणिकरण करणे शिल्लक असून याबाबत संबंधित खातेदारांना कळविण्यात आले आहे.
शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्या अनुषंगाने कृषी व्यवसाय फायद्याचा करणे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा शासनाच्या धोरणाचा उद्देश आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले होते. यामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला होता.