दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
राज्यातील ५११ ग्रामीण भागातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील २० केंद्रांचाही समावेश आहे. त्यामध्ये फलटण तालुक्यातील कोळकीचाही समावेश आहे.
कोडोली ग्रामपंचायतीच्या सांस्कृतिक भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमास मुंबई येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री शंभूराज देसाई हे दूरदृष्य प्रणालीद्वारे तर आमदार महेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय मांगलेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवि साळुंखे, अर्चना देशमुख, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील कोडोली, लिंब व नागठाणे, कराड तालुक्यातील विंग, सैदापूर, उंब्रज, रेठरे बु, फलटण तालुयात कोळकी, खंडाळा तालुक्यात शिरवळ व पारगाव, खटाव तालुक्यात औंध व पुसेगाव, कोरेगाव तालुक्यात वाठार स्टेशन, माण तालुक्यात गोंदवले बु, पाटण तालुक्यात मल्हार पेठ व तारळे, जावली तालुक्यात कुडाळ, महाबळेश्वर तालुक्यात भिलार व वाई तालुक्यात यशवंतनगर व भुईंज या ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.