मंत्रालय प्रांगणात छायाचित्र आणि चित्र प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२२ । मुंबई । जागतिक वारसा दिनानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात छायाचित्र आणि चित्र प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार संजय दौंड, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह संबधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेले हे छायाचित्र आणि चित्र प्रदर्शन 22 एप्रिलपर्यंत मंत्रालय प्रांगणात असणार आहे. जवळपास 350 छायाचित्र या प्रदर्शनात असून यामध्ये प्रामुख्याने राज्यातील गड आणि किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात आल्यानंतरचे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतात. तर चित्रकार प्रसाद पवार यांनी साकारलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांची काही दुर्मिळ चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

जागतिक वारसा दिनी सर्व संग्रहालयात पर्यटकांना विनामूल्य प्रवेश

पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या चंद्रकांत मांढरे चित्रसंग्रहालय कोल्हापूर, नागपूर, सिंदखेडराजा, औरंगाबाद, सांगली, सातारा, औंध, नाशिक, रत्नागिरी, पैठण, तेर व माहूर या शासकीय संग्रहालयांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या प्राचीन कलाकृतींचे महत्त्व जनतेला समजावून सांगणे, संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलेल्या वास्तुंची, प्राचीन कलाकृतींची माहिती व महत्त्व पर्यटकांना, संग्रहालय प्रेमींना, शालेय विद्यार्थ्यांना माहिती जागतिक वारसा दिनानिमित्ताने दिली जाईल. या दिनानिमित्त सर्व संग्रहालये पर्यटकांसाठी विनामूल्य प्रवेश देणार आहेत. संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयांद्वारा हेरीटेज वॉक, व्याख्याने, स्पर्धा असेही कार्यक्रम घेतले जातील.


Back to top button
Don`t copy text!