उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१० एप्रिल २०२२ । बारामती । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील सुपे येथील श्री मयुरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी  पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे  उद्घाटन आणि  4 कोटी 90 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी   सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  पुरुषोत्तम जगताप, एकात्मिक पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, नीता बारावकर, सुपेच्या सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच मल्हार खैरे, मयुरेश्वर सहकारी संस्थेचे अध्यक्ष तुषार हिरवे, उपाध्यक्ष अभिजित  थोरात, सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे आदी  उपस्थित होते.

यावेळी श्री. पवार म्हणाले, श्री मयुरेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून सुपे येथील व्यापारी, शेतकरी, महिला व लघु उद्योजक यांना चांगला आर्थिक स्त्रोत उपलब्ध झाला आहे.  पतसंस्थेने सहकार्याची भूमिका घेऊन लोकांना मदत करावी. संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. विश्वासाने ठेवलेल्या ठेवी  सुरक्षित राहिल्या पाहिजेत. संस्थेत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सर्वांनी काम करावे. संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब बांधवाना मदत कशी मिळेल याकडे संस्थेच्या संचालक मंडळाने लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

विकास कामाबाबत बोलताना श्री. पवार म्हणाले, सुपे परगण्यात मोठ्या प्रमाणात  विकासकामे करण्यात येत आहेत. सुपे येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या  श्रेणीत वाढ करण्याबाबत  प्रस्ताव ग्रामपंचायतीने सादर करावा.  सुपे गावात 100 एकर जागेत महिला पोलिसांसाठी सुविधा आणि चांगले शैक्षणिक संकुल उभे करायचे आहे. मुलांचे- मुलींचे वसतिगृह, शिवसृष्टी इत्यादी अनेक कामे करावयाची आहेत. याबाबत  संबंधित पदाधिकारी- अधिकारी यांनी प्रस्ताव सादर करावेत.

उन्हाळ्यात विजेची मागणी वाढत आहे. विजेची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बाहेरच्या कंपन्याकडून वीज खरेदी करण्यात येणार आहे. नागरिकांनी वीज बिल व  घर पट्टी वेळेत भरली पाहिजे  तरच चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध  होतील.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करूनच ऊसाचे उत्पादन घ्यावे.  सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप होईपर्यंत कारखाने चालूच राहतील, याबाबत संबंधितांना आदेश  देण्यात आले आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

सुपे परिसरातील विविध विकासकामांची केली पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सुपे परिसरातील कृषि उत्पन्न बाजार समितीची इमारत, ग्रामीण रुग्णालय इमारत, सुपे ग्रामीण पोलीस स्टेशन, मयुरेश्वर अभयारण्य, विद्या प्रतिष्ठान संकुल इत्यादी ठिकाणी चाललेल्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, तहसिलदार विजय पाटील,  गटविकास अधिकारी अनिल बागल,   सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे,   उपअभियंता सा. बा. वि. राहुल पवार आदी उपस्थित होते.

पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे नव्याने सुरू केलेल्या  हडपसर- चौफुला- सुपे  व हडपसर- सासवड- जेजुरी- सुपे या बस सेवेचा शुभारंभ व  संभुराजे प्रतिष्ठान सुपे आयोजित बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन आज  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!