दैनिक स्थैर्य | दि. 10 जुन 2024 | फलटण | गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात पाऊस झाल्याने पुण्याच्या रस्त्यांनी नदीचे स्वरूप धारण केले होते. मुंबई मध्ये हे नेहमीचेच आहे. परंतु आपल्या फलटण शहरात सुद्धा फक्त दोन पाऊस झाल्यानंतर रस्त्यांवर पाणी साचत असल्याचे बघायला मिळत आहे. चेंबर वर आणि रस्ता खाली अशी परिस्थिती शहरातील बऱ्याच भागात बघायला मिळते. यावर सबंधित कंत्राटदारावर पालिका प्रशासन नक्की काय कारवाई करणार ? की नेहमी प्रमाणे डोळे झाक करणार ? या कडे आता फलटण शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस बरसत आहे. गेल्या काही दिवसांपासून फलटण शहरासह तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. परंतु शहरामध्ये राहणारे नागरिक मात्र रस्त्यावरील असणाऱ्या पाण्याने वैतागले आहेत.