राज्य अभ्यासक्रम आराखडा-पायाभूत स्तर विकसन समितीमध्ये डॉ. मंजिरी निंबकर यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑक्टोबर २०२३ | मुंबई |
राज्य अभ्यासक्रम आराखडा-पायाभूत स्तर (एससीएफ-एफएस) विकसनाकरिता तज्ज्ञ समितीमध्ये निमंत्रित/स्विकृत सदस्यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली असून या समितीमध्ये प्रगत शिक्षण संस्थेच्या विश्वस्त तथा उपाध्यक्ष, भाषातज्ञ डॉ. मंजिरी निंबकर यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. मंजिरी निंबकर गेली ३५ वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध शालेय स्तरावर इंग्लिश, भूगोल, गणित व विज्ञान या विषयांचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावर अध्यापन, बाल शिक्षिका प्रशिक्षण व अभ्यासक्रम निर्मिती व विकास यावर मार्गदर्शन व विशेष कार्य त्यांनी केले आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रशिक्षणे व ग्रंथालय प्रशिक्षणात साधन व्यक्ती म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. मुलांच्या स्वतंत्र लेखनाचा विशेष अभ्यास व यावर प्रकाश टाकणारे मुलांचे सृजनात्मक लेखन हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले आहे. विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके यामधून बालशिक्षण व बालसाक्षरतेवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.मुलांचे ग्रंथालय या पुस्तकाचेही त्यांनी संपादन केले आहे. या पुस्तकाला स्व.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा विशेष पुरस्कारही देण्यात आला आहे.

सध्या डॉ. मंजिरी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या निपुण भारत अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुका २५ जिल्हा परिषद शाळा व १८० अंगणवाड्या व सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील ५० अंगणवाड्यांसोबत पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणात काम सुरू आहे. बालशिक्षणात नव्याने सुरू असणार्‍या विविध प्रयोगांच्या माध्यमातून डॉ. मंजिरी निंबकर यांचे सुरू असणारे कार्य व त्यांच्या संशोधनाचा व अनुभवाचा निश्चित या समितीमध्ये उपयोग होईल.

या समितीत श्री. निलेश निमकर, श्रीमती डॉ. मंजिरी निंबकर, डॉ. वृषाली देहाडराय श्रीमती सुषमा साठ्ये, डॉ. मधुश्री संजीव सावजी, श्री. संतोष बाळासाहेब भणगे, डॉ. सत्यपाल विजयराव सोवळे, श्री. लक्ष्मण धाकलू चव्हाण, सौ. नंदिनी किरण भावे, श्रीमती माधुरी सावरकर, उपसंचालक (बाल शिक्षण) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे सदस्य सचिव यांचा समावेश करण्यात आला आहे.

नुकतेच या नियुक्तीचे पत्र कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन श्रीमती मृणाली काटेंगे यांनी दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल प्रगत शिक्षण संस्थेचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, शिक्षक व सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!