दैनिक स्थैर्य | दि. २१ मे २०२४ | फलटण |
भारत सरकारच्या सैनिक मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल ‘एंट्रास’ परीक्षेमध्ये लोणंद येथील कु. रुद्रनिल कपिल जाधव याने घवघवीत यश संपादन करून चंद्रपूर येथील सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळविला आहे.
रुद्रनिल कपिल जाधव हा जि. प. प्राथमिक शाळा, कोपर्डे येथे शिकत होता. राज्य शासनामार्फत घेण्यात येणार्या अनेक स्पर्धात्मक परीक्षेमध्ये त्याने यापूर्वी अनेकदा यशाला गवसणी घातलेली आहे. अभिरूप परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यात त्याचा १८ वा क्रमांक आलेला आहे. २४२ गुण त्याला मिळाले. तसेच स्कॉलरशीप परीक्षेमध्ये देखील तो यश मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चमकला आहे व शिष्यवृत्ती मिळवली आहे.
रुद्रनीलच्या या यशात धैर्यशील शेळके, पंकज रासकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. इयता ६ वी मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात येणार्या ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रास परीक्षेमध्ये त्याने गणित या विषयात १५० पैकी १५० गुण मिळवून एकूण २६६ गुण मिळवत संपूर्ण देशात १४६० रँक मिळवली आहे. त्यामुळे त्याची निवड चंद्रपूर येथील सैनिक स्कूलमध्ये झाली आहे.
लोणंद येथील सम्राट उद्योग समूहाचे व्यवस्थापक कपिल धन्यकुमार जाधव व स्वाती कपिल जाधव यांचा तो मुलगा आहे. सैनिक स्कूल परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी त्याला तळेगाव दाभाडे येथील गोरे सर एज्युकेशन अकादमीचे संस्थापक गजानन गोरे सर व तेथील सर्व शिक्षक स्टाफ यांचे मार्गदर्शन मिळाले.
या घवघवीत यशाबद्दल रुद्रनीलचे परिवारातील सर्व सदस्य तसेच आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.