दैनिक स्थैर्य । दि.१० एप्रिल २०२२ । सातारा । महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धच्या शेवटच्या दिवशी गादी गटामध्ये सातारा जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला. 74 किलो गादी गटामध्ये साताऱ्याच्या पैलवान आकाश माने याने ठाणे जिल्ह्याच्या वैभव माने याचा पराभव केला तर 97 किलो वजनी गटामध्ये साताऱ्याच्या गणेश कुकुले याने पुण्याच्या रोहित जवळकर यांचा तांत्रिक गुणांनी मात करत सुवर्णपदकाची तर साताऱ्याच्या तुषार डोंबरे याने कास्य पदकाची कमाई केली. सातारा जिल्ह्याच्या खात्यावर एक सुवर्ण दोन कास्य पदके जमा झाली. सकाळच्या सत्रात ७४ किलो गादी विभागातील अंतिम फेरीत पुण्याच्या शुभम थोरात याने लातूरच्या आकाश देशमुख याचा ७-६ असा पराभव करून सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. तर आकाशने रौप्यपदक जिंकले. या गटातील कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत साताऱ्याच्या आकाश माने याने ठाण्याच्या वैभव माने याचा १०-८ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. तर दुसऱ्या कांस्य पदकाच्या लढतीत कोल्हापूर शहराच्या स्वप्निल पाटील याने सांगलीच्या प्रथमेश गुरव याचा ७-४ असा पराभव करून कांस्यपदक पटकावले.
९७ किलो गादी विभागातील अंतिम लढतीत सोलापूरच्या सुनील खताळ याने मुंबईच्या वैभव रासकर याचा ७-२ ने पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले तर वैभवला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याच गटातील कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत साताऱ्याच्या तुषार डोंबरे याने पुण्याच्या रोहित कारले याचा ९-२ ने पराभव करून कांस्यपदक जिंकले तर दुसऱ्या कांस्य पदकाच्या लढतीत वाशिमच्या धनाजी कोळी याने कोल्हापूर शहराच्या अनिकेत राऊत यांचा २-१ पराभव करून कांस्यपदक पटकावले.
९७ किलो माती विभागातील अंतिम फेरीत साताऱ्याच्या गणेश कुकुले याने पुण्याच्या रोहित जवळकर यांचे ३-३ असे समान गुण झाले होते. मात्र उच्च कलात्मक डावाच्या गुणाच्या आधारे गणेश कुकुलेने रोहितचा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले तर रोहितला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटातील कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबासाहेब रानगे याने जळगावच्या गोपाळ जाने याला चितपट करून कांस्य पदक पटकावले.
६१ किलो माती विभागातील अंतिम फेरीत पुण्याच्या सचिन दाताळ याने कोल्हापूर जिल्ह्याच्या ओंकार लाड याचा ४-० पराभव करून सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली तर ओंकारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत सांगलीच्या राहुल पाटील याने कोल्हापूर शहराच्या सरदार पाटील याचा २-० असा पराभव करून कांस्यपदक जिंकले.