अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलांनी पक्षकाराची बाजू अभ्यासपूर्वक मांडावी – न्या. प्रकाश नाईक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ५ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या माध्यमातून या भागातील लोकांना वेळ व पैशाची बचत करून, प्रवास टाळून येथे घराजवळ न्याय मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे, त्याचा लाभ लोकांना मिळवून देण्यासाठी वकिलांनी आपल्या पक्षकाराची बाजू अभ्यासपूर्वक मांडून काम करण्याचे आवाहन मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी केले.

फलटण येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन न्या. नाईक यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले, त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. विनायक रा. जोशी होते. यावेळी फलटणचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. प्रविण विमलनाथ चतुर, महाराष्ट्र-गोवा वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. भोसले विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायायातील न्यायाधीश, तेथील वकील संघांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, महसूल व पोलिस अधिकारी, पक्षकार यावेळी उपस्थित होते.

न्याय हा घटनात्मक अधिकार असून तो सर्वांना मिळालाच पाहिजे, तो या न्यायालयात नक्की मिळेल याची ग्वाही देत वकील व न्यायालय यांची सांगड असल्याशिवाय न्यायालयाचे कामकाज सुरळीत चालणार नाही, गरज नसेल त्यावेळी तारखा न घेता प्रत्यक्ष कामकाज चालवून लवकर न्यायप्रक्रिया गतिमान करा, लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास ढळू देवू नका, असे आवाहन न्या. प्रकाश नाईक यांनी यावेळी केले.

कोणत्याही खटल्यामध्ये दोन बाजू असतात, न्याय एकालाच मिळतो, मात्र वकिलांनी आपल्या पक्षकाराची बाजू अभ्यासपूर्वक मांडून त्यांचा विश्वास जपला पाहिजे, कोर्टाशी भांडून नव्हे! आपली बाजू कायदेशीरदृष्ट्या भक्कमपणे मांडून पक्षकाराचा विश्वास सांभाळा, असे आवाहन न्या. नाईक यांनी वकिलांना केले.

स्वातंत्र्यसंग्रामात वकिलांचा सक्रिय सहभाग होता, लोकांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात वकील कार्यरत असतात, सामाजिक क्षेत्रातही वकिलांचा मोठा सहभाग असल्याचे न्या. नाईक यांनी आवर्जून सांगितले.

पक्षकाराची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी वकिलांनी प्रोसिजरल लॉ, इव्हीडन्स अ‍ॅक्ट, न्यायशास्त्र, इंडीयन पिनल कोड वगैरे कायद्याचा अभ्यास तर केलाच पाहिजे, त्याशिवाय विविध निकाल आणि अवांतर वाचन केले पाहिजे. त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असले पाहिजे. कोर्टासमोर बाजू मांडताना सहजपणे, मात्र अभ्यासपूर्ण बाजू मांडल्याने न्यायालय आपली बाजू ऐकण्यास अधिक वेळ देते आणि आपली बाजू समजावून घेतल्याने न्यायासाठी त्याचा निश्चित उपयोग होत असल्याचे न्या. नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.

फलटण वकील संघाच्या सदस्यांना या न्यायालयाच्या माध्यमातून आपली वकिली अधिक चांगल्याप्रकारे वृध्दिंगत करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आपली बाजू प्रभावीपणे कशी मांडावी, उलट तपासणी कशी घ्यावी, हे आत्मसात करा. त्यासाठी संविधानाचा अभ्यास करा, निकालपत्रांचा अभ्यास करा, वक्तृत्व कला विकसित करा, असे आवाहन यावेळी न्या. नाईक यांनी केले.

सहज, सुलभ, कमी खर्चात न्याय मिळावा यासाठी न्याययंत्रणा कार्यरत आहे. फलटण जिल्हा न्यायालयात १२०० खटले वर्ग झाले असून सकारात्मक भूमिका घेऊन न्यायप्रक्रिया राबवावी. जुनी प्रकरणे खूप आहेत, ती प्राधान्याने निकाली काढावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. विनायक जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

यावेळी महाराष्ट्र-गोवा वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. भोसले, फलटण वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पठाण यांची भाषणे झाली. वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सस्ते यांनी समारोप व आभार मानले.

प्रारंभी फित कापून फलटण अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयातील न्या. प्रकाश नाईक, जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. विनायक जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!