सातार्‍यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी


स्थैर्य, 1 फेब्रुवारी, सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लढतींचे चित्र चिन्ह वाटपानंतर स्पष्ट झाले असून सातारा तालुक्यातील आठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 16 गणांमध्ये कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी अशी लढत होत आहे. काही गटातले उमेदवार हे सातार्‍यातच तळ ठोकून असतात. काहिंनी गटात, गणात प्रचाराचा धुरळा उडवला आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना अशीच लढत होताना दिसत आहे.
कोण कोणाच्या विरोधात लढत आहे हे स्पष्ट शाल्याने तालुक्यात प्रचाराला वेग आला आहे. त्यामध्ये कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी असे चित्र आहे. पाटखळ गटात राष्ट्रवादीच्या गोवे गावच्या शुंभागी जाधव विरुद्ध भाजपच्या वाढे गावच्या गौरी नलवडे यांच्यात काँटे की लढत होत आहे.त्या दोघींमध्ये खासदार उदयनराजे यांच्या कट्टर समर्थक गितांजली कदम याही नशीब आजमवत आहेत. लिंब गटात राष्ट्रवादीचे राजेंद्र लावंघरे आणि भाजपचे सर्जेराव सावंत यांच्यात लढत होत असली तरीही रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले हे दोघांच्या विरोधात रिंगणात उभे आहेत. सर्वात महत्वाचा गट म्हणून खेडकडे पाहिले जाते. खेड गटात राष्ट्रवादीच्या वतीने कामेश कांबळे आणि भाजपाचे संदीप शिंदे यांच्यात प्रमुख लढत होत असली तरीही या गटात वंचितचे अमोल गंगावणे आणि रिपब्लिकन सेनेचे स्वप्निल हराळ हेही आपले नशिब आजमावत आहेत. त्यांना कितपत यश येते हे त्यांच्या प्रचारावर स्पष्ट होणार आहे. परंतु इतरांच्या प्रचाराने चांगले रान तापले आहे.

कोडोली गटात भाजपच्या निता खरात आणि राष्ट्रवादीच्या कांचन साळुंखे या दोर्धीमध्ये प्रमुख लढत मानली जात असली तरीही धनगरवाडीच्या अपक्ष उमेदवार संगीता नंदकुमार माने यांचा नेमका कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा हा औत्सुक्याचा विषय आहे. कारी गटात तर भाजपचे राजू भोसले यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे दीपक कदम आणि उबाठाचे सचिन मोहिते अशी तिरंगी लढत आहे. तिघांचा प्रचार जोरात सुरु आहे. शेंद्रे गटात शिवसेनेच्या उर्मिला पडवळ विरुद्ध भाजपच्या पूजा मोरे यांच्यात लढत होत आहे. वर्णे गटात भाजपचे वैभव चव्हाण यांच्या विरोधात स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके या दोघांमध्ये लढत होत आहे. येथे रासपचे वैभव गवळी आणि अपक्ष उमेदवार माजी पंचायत समितीचे सदस्य संजय घोरपडे हे दोघे रिंगणात आहेत. त्यात संजय घोरपडे हे नेमकी कोणाची मते घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

नागठाणे गटात शिवसेनेचे अजितकुमार जाधव तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे दत्तात्रय ढाणे आणि भाजपचे अजितकुमार साळुंखे तसेच अपक्ष अशी चौरंगी लढत पहायला मिळत आहे. तर शिवथर गणात राष्ट्रवादीचे राजेश पवार विरुद्ध भाजपचे किशोर शिदे, पाटखळ गणात भाजपचे राहुल शिंदे विरुद्ध शिवसेनेचे हणमंत सोनटक्के, लिंबमध्ये भाजपचे प्रभाकर पवार विरुद्ध अपक्ष सचिन पाटील, जितेंद्र सावंत,कोंडवेत भाजपचे महेश गाडे विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेंद्र लावंघरे, खेडमध्ये भाजपच्या मधू कांबळे, राष्ट्रवादीच्या कोमल गायकवाड आणि वंचितच्या महानंदा जाधव, क्षेत्रमाहुलीत भाजपच्या स्वाती जाधव, राष्ट्रवादीच्या राणी पवार, अपक्ष पुष्पा कोळपे, कोडोलीत राष्ट्रवादीचे राहुल कापले, भाजपाचे रामदास साळुंखे आणि अपक्ष प्रमोद जाधव, संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या नीलम पवार, भाजपच्या विजया साळुंखे, अपक्ष मिनल जाधव, परळीत शिवसेनेचे सचिन देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विद्याधर निकम,भाजपचे वसंतराव भंडारे, उबाठाचे सागर रायते, कारीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षच्या सुनीता कदम, शिवसेनेच्या कांचन जाधव, उबाठाच्या सुनंदा महामुलकर, भाजपच्या शोभा लोटेकर, निनामध्ये शिवसेनेच्या नलिनी पवार विरुद्ध भाजपच्या प्रमिला सुतार, शेंद्रेत भाजपच्या कोमल दळवी विरुद्ध शिवसेनेच्याा मनिषा भोसले, वर्णेत राष्ट्रवादीच्या स्वप्नाली फडतरे विरुद्ध भाजपच्या साक्षी माने, अपशिंगेमध्ये राष्ट्रवादीचे विशाल कांबळे, भाजपचे मानसिंग मोरे, वंचितचे आबा न्यायनित आणि अपक्ष उद्धव मोहिते, नागठाणेमध्ये भाजपाचे राजेंद्र ढाणे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुखदेव पवार, शिवसेनेचे संतोष साळुंखे तर अपक्ष दत्तात्रय ढाणे, अतितमध्ये भाजपच्या सुषमा जाधव, उबाठाच्या कामिनी तळेकर, शिवसेना शिंदे गटाच्या प्रमिला यादव अशी लढत होत आहे.


Back to top button
Don`t copy text!