
दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यात आगामी काळात होणार्या फलटण नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये परिवर्तन अटळ असून फलटण तालुक्याचा मागील इतिहास पाहता कोणी कितीही वल्गना केल्या तरी १० ते १५ वर्षाव्यतिरिक्त कोणाचाही कार्यकाळ चालला नसल्याने आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेसहित स्थानिक निवडणुकांमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नसल्याचे मत ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संपर्क दौर्यावेळी हिंगणगाव येथील आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, सिराज शेख, युवा नेते अमित रणवरे, सुरवडीचे माजी सरपंच जितेंद्र साळुंखे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जेष्ठ नेते साळुंखे-पाटील पुढे म्हणाले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने आपल्या तालुक्याला सक्षम पर्याय मिळाला आहे. काम करणारा खासदार व सर्वसामान्यांना न्याय देणारा खासदार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ओळख असून येत्या काळात हिंगणगावसह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे हात आपण बळकट केले पाहिजेत.
या सभेस हिंगणगाव परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते.