दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२१ | मुंबई | महाड परिसरात भविष्यात पुरामुळे दुर्घटना तसेच वित्त आणि मनुष्यहानी होऊ नये यासाठी जलदगतीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. सावित्री नदीच्या पात्रातील दगड, माती आणि वाळू उत्खनन करण्यासंदर्भात तेथील परिसराचे पर्यावरणीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण करून तातडीने त्याचा अहवाल पर्यावरण विभागाच्या मान्यतेसह सादर करावा, गाळ काढण्याचे काम कालमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
महसूल मंत्री श्री. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सावित्री नदीच्या पात्रातील वाळू-दगड उत्खननाबाबतच्या कामाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भविष्यातील मनुष्यहानी व वित्तहानी टाळण्यासाठीच्या दृष्टीने जलदगतीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी बंदरे विकास विभागाचे मंत्री अस्लम शेख, माजी आमदार हुस्नबानो खलीफे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे संचालक श्री. टोके, मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, कोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील हे उपस्थित होते. याचबरोबर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचे जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, या वर्षी सावित्री नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दगड, माती, वाळूचा गाळ असल्याने तेथे पाणी साचून ते महाड शहरामध्ये जाते यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी होते. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी या भागाचे पर्यावरणीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करावा. याचबरोबर गाळ उपसण्याच्या कामास गती द्यावी. आपत्ती टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कामासाठी सर्व विभागांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून व सहकार्याने काम करणे गरजेचे असल्याचेही मंत्री श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले. नदी पात्रातील गाळ काढण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील स्थानिकांना सांगितले होते. या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा, असेही मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले.