स्थैर्य, सातारा, दि. 07 : नागठाणे (ता.सातारा) येथे काही कुटुंबियांच्या शौचालयातील मैला हा शोषखड्डा न काढता थेट ओढ्यात सोडला असून हा ओढा उरमोडी नदीस मिळत आहे. नदीपात्रात गाव पाणी पुरवठा विहीर असून त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे अँड. प्रवीण श्रीरंगराव गोरे यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ते रहात असलेल्या घरामागे पूर्वेस ओढा असून ओढ्याच्या पलीकडे काही कुटुंबियांची घरे आहेत. त्यांची घरे पूर्वाभिमुख असून ओढ्याच्या बाजूला शौचालये आहेत. सदर इसमांनी शौचालये काढताना शोषखड्डा काढला नाही. त्यामुळे शौचालयातील सर्व मैला थेट ओढ्यात पडत आहे. हा ओढा पुढे उरमोडी नदीला मिळत असून नदीपात्रातच नागठाणे गावाला पाणी पुरवठा करणारी गाव विहीर आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीही दूषित होत असून ओढ्यातून परिसरात दुर्गंधीही पसरत आहे.
सध्या महाराष्ट्रासह देशाला कोरोना रोगाने ग्रासले असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन झटत आहे. मात्र या घटनेमुळे गावात साथीचे पसरण्याची दाट शक्यता आहे. याबाबत प्रत्यक्ष भेटुन याची माहितीही दिली असून अद्यापही यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तरी संबंधितांवर ग्रामपंचायतीने लवकरात लवकर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवेदनात शेवटी केली आहे.
निवेदनाच्या प्रति आरोग्य विभाग (जिल्हा परिषद, सातारा) व गटविकास अधिकारी (पंचायत समिती, सातारा) यांना देण्यात आल्या आहेत.