दैनिक स्थैर्य | दि. १८ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
कोळकी (ता. फलटण) येथील शिवाजीराजे नगरमध्ये जमिनीच्या वादातून एका कुटुंबास तिघांनी कोयता, लोखंडी गज व बेस बॉलच्या लाकडी दांडक्याने दमदाटी व शिवीगाळ करून घरासमोरील चारचाकी गाडी फोडून नुकसान केल्याची तक्रार फलटण शहर पोलिसात दाखल झाली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी नंदकुमार उर्फ छोटू कचरे व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, कोळकीतील शिवाजीराजे नगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहणार्या सौ. कुंदा दिनकर शिंदे ह्या शेती करतात. त्यांच्या पुतणीचा विवाह शेजारी राहणार्या सूरज धनंजय क्षीरसागर यांच्याशी झाला आहे. सूरज क्षीरसागर यांचा शेजारीचा राहणार्या बाळासाहेब कचरे व छोटू कचरे यांच्याबरोबर न्यायालयात दावा सुरू आहे. दि. १७ फेब्रुवारी रोजी सौ. कुंदा शिंदे ह्या त्यांचा मुलगा गणेश न आल्याने ते पती, मुलांसोबत घरात झोपले असताना रात्री १.१५ वाजता दरवाजा जोरात वाजत असल्याने त्या उठल्या तेव्हा घराच्या खिडकीची काच फुटलेली त्यांना दिसली. त्यावेळी नंदकुमार उर्फ छोटू कचरे व दोन अनोळखी व्यक्ती कोयता, लोखंडी गज व बेस बॉलचे लाकडी दांडके घेऊन घरात घुसले व त्यांनी दमदाटी करत ‘तुमचा मुलगा गणेश कोठे गेला आहे. त्याला फोन करून बोलावून घ्या, नाहीतर तुमचे घर पेटवून देऊ’ असे म्हणत घरातून बाहेर आले व अंगणात शिंदे यांची उभी असलेली वॅगनार कारच्या त्या तिघांनी काचा फोडून, दरवाजा तोडून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर ते तिघे दमदाटी करत मोटारसायकलवरून निघून गेल्याची तक्रार सौ. कुंदा शिंदे यांनी फलटण शहर पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी नंदकुमार उर्फ छोटू कचरे व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास फलटण शहर पोलीस करत आहेत.