जिंती येथील जितोबा मंदिरात जमावाकडून बाप-लेकीस मारहाण, अपहरणाचा प्रयत्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २६ मे २०२३ | फलटण |
जिंती (ता. फलटण) येथील जितोबा मंदिरात बाप व लेकीस सुमारे १४ जणांच्या जमावाने देव घातल्याच्या कारणावरून मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दिलीप सदाशिव रणवरे (रा. जिंती) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून वृषभ दिलीप रणवरे (वय २५, रा. जिंती), सुजाता पवार (वय ३०, रा. मुंबई), मैना सोनवणे (वय २८, रा. कोराळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे), सत्यवान दत्तोबा रणवरे (वय ४८), उदयसिंग शिवराम रणवरे (वय ५०), मोहन कृष्णा रणवरे (वय ५५), बाळासो कृष्णा रणवरे (वय ६५), दिलीप रत्नसिंह रणवरे (वय ५५), भानुदास बापू रणवरे (वय ५८), निखिल भानुदास रणवरे (वय २०), मनोहर मोहन रणवरे (वय ३५), मनोहर मोहन रणवरे यांचा मुलगा व दोघा अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिंती (ता. फलटण) येथील जितोबा मंदिरात दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.०० वाजता ते दि. १४ मे २०२३ रोजी पहाटे ४.०० वाजण्याच्या सुमारास वृषभ दिलीप रणवरे याने स्वत:च्या अंगात आणून ‘तू माझ्या धंद्याचे वाटोळे केलेस, तू देव घातलास, त्यामुळे मला त्रास होत आहे’, असा फिर्यादी यांच्यावर आरोप करून तेथेच असलेला देवाचा लोखंडी त्रिशूळ व देवाची झोळी घेऊन अंगावर धावून आला व तुला मी स्वीकारणार करणार नाही, तुला मी चॅलेंज देतो, मी तुला संपवायलाच आलोय, अशी धमकी देवून त्याने फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर दिलीप रत्नसिह रणवरे व त्याच्यासोबत दोन अनोळखी इसम यांनी फिर्यादीची गाडी अडवून फिर्यादी यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. तसेच बगाड यात्रेचा कार्यक्रमाप्रमाणे वृषभ दिलीप रणवरे याच्याकडून कार्यक्रम करत असताना त्या ठिकाणी फिर्यादी यांची मुलगी स्वाती रणवरे ही शूटींग करीत असताना सुजाता पवार (रा. मुंबई), मैना सोनवणे (रा. कोर्‍हाळे बुद्रुक, ता. बारामती, जि. पुणे) यांनी मुलीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सत्यवान दत्तोबा रणवरे, उदयसिंह शिवराम रणवरे, मनोहर मोहन रणवरे, मोहन कृष्णा रणवरे, बाळासो कृष्णा रणवरे, भानुदास बापू रणवरे, निखिल भानुदास रणवरे, मनोहर मोहन रणवरे यांचा मुलगा (सर्व रा. जिंती) यांनी शिवीगाळ, दमदाटी केली, अशी तक्रार फिर्यादी यांनी पोलिसात दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी वरील सर्व आरोपींवर अपहरण करण्याचा प्रयत्न करणे व बेकायदेशीरपणे जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करणे असे गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार हांगे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!