लष्कर भरतीच्या पेपर फुटीप्रकरणी बारामती-फलटण कनेक्शन समोर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२५: लष्करात भरती करून घेण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक करून लाखो रुपयांचा घोटाळा करणार्‍या टोळीचा पर्दाफाश झाला असून एकास अटक करण्यात आली आहे तर एक फरार आहे. पोलिसांत तपासात घोटाळ्याचे फलटण आणि बारामती कनेक्शन समोर आले असल्याने आता सर्वच भरतीपूर्व केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे लष्करात भरती करुन देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक करुन लाखो रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलीसांनी लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या सहकार्याने एका टोळीला अटक केली होती. त्यामध्ये लष्कराच्या भरती कार्यालयातील कर्मचार्‍यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाच्या तपासात सदर घोटाळ्यात बारामती आणि फलटण येथील काहीजणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. बारामती येथील किशोर गिरी आणि ज्ञानेश्‍वर परदेशी लष्कर भरतीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांपर्यंत पाहोच करण्याची जबाबदारी पार पाडली होती. पोलिस तपासात दोघांनीही या घोटाळ्यात महत्वाची भूमिका पार पाडल्याचे स्पष्ट झाले असून किशोर गिरी व ज्ञानेश्‍वर परदेशी भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र चालवत होते. याप्रकरणी किशोर गिरीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून ज्ञानेश्‍वर परदेशी फरार आहे. आता याप्रकरणात सातारा, फलटण, पुसेगांव, बारामती येथील सैन्य भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्रांची तपासणी होणार आहे. आत्तापर्यंत पुणे पोलिसांकडून 11 मेजर दर्जाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान देशाच्या संरक्षणाशी संबंधित याप्रकरणात जबाबदार असणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व राजकीय आश्रयाखाली यांना अभय मिळू नये अशी अपेक्षा प्रामाणिक उमेदवारांकडून होत आहे.


Back to top button
Don`t copy text!