फलटणमध्ये भिंती रंगल्या, उकिरडा तसाच…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑगस्ट २०२३ | फलटण |
गेल्या काही दिवसांपासून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ चे कामकाज फलटणमध्ये सुरू झाले आहे. फलटण शहरामध्ये नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणच्या नावाखाली फक्त रंगरंगोटी करताना दिसत आहे. फलटण शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य ‘जैसे थे’च म्हणण्यापेक्षा शहरात फक्त घाणीचेच साम्राज्य आहे. फलटण नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये फक्त रंगरंगोटी करण्यापेक्षा वास्तविक स्वच्छता करणे गरजेचे आहे, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

फलटण नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणचे कामकाज सुरू आहे. त्यामध्ये नुकतेच शहरातील मोकाट जनावरे पकडण्याचे काम नगर परिषदेने सुरू केले आहे. त्यामध्ये शहरातील डुक्कर पकडण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विशेष मोहीम राबवत सुमारे तीन टेम्पो डुक्कर पकडली आहेत. त्यामुळे शहर डुक्करमुक्त झाले आहे का? असा प्रश्न सुद्धा उपस्थित राहत आहे. आगामी काळामध्ये शहरातील मोकाट जनावरे पकडण्याचे कामकाज नगरपरिषदेने करावे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

फलटण शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण हे केवळ मूल्यमापन करण्याचे साधन न राहता एक प्रेरणा साधन म्हणून विकसित झाले आहे. कुठेही हाती घेतलेल्या या सर्वात मोठ्या सर्वेक्षणाने ग्राउंड लेव्हलवर ठळक बदल घडवून आणले आहेत. ज्या शहरांनी चांगली कामगिरी केली आहे, त्यांना विविध पुरस्कारसुद्धा प्राप्त झाले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून नगर परिषदेला विविध निधी हा मंजूर होऊन येत असतो; परंतु फलटण नगरपरिषद फक्त रंगरंगोटी करण्यापेक्षा वास्तविक स्वच्छतेचे कामकाज करणे गरजेचे आहे.


Back to top button
Don`t copy text!