दैनिक स्थैर्य | दि. २ मे २०२३ | फलटण |
ढवळेवाडीत शेतजमिनीस पाणी पाजण्याच्या कारणावरून सख्ख्या भावांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी विनायक रामचंद्र सुतार (वय ५९, राहणार ढवळेवाडी, पोस्ट निंभोरे, तालुका फलटण, जिल्हा सातारा) व सख्ख्या भावाचा मुलगा लक्ष्मीकांत हरिभाऊ सुतार (वय ४२, राहणार ढवळेवाडी निंबोरी, तालुका फलटण) यांनी फिर्यादी दिल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक ०१/०५/२०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता ढवळेवाडी हद्दीत गट क्र. ५६ मध्ये पाईपलाईनच्या पाईपा का फोडल्या, असे विचारले असता फिर्यादी विनायक रामचंद्र सुतार यांना त्यांचा भाऊ व दोन पुतणे यांनी ‘तुला लय मस्ती आलीय’, असे म्हणून शेतातील असले कुर्हाडीने हरिभाऊ सुतार याने पाठीत व डोक्यावर मारले व गणेश हरिभाऊ सुतार याने खोर्याने पाठीत मारले. तसेच हरिभाऊ रामचंद्र सुतार यांनी हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच लक्ष्मीकांत हरिभाऊ सुतार, गणेश हरीभाऊ सुतार व हरिभाऊ रामचंद्र सुतार (सर्व रा. ढवळेवाडी, ता. फलटण) यांनी संगणमत करून शिवीगाळ दमदाटी करून खोरे कुर्हाडीने मारहाण करून जखमी केले, अशी एक तक्रार दाखल झाली आहे.
दुसर्या तक्रारीत ढवळेवाडी निंभोरे, ता. फलटण गावच्या हद्दीत शेतात भुईमूगाला पाणी पाजण्याकरीता गेलो असता सामाईक पाईपलाईन फुटल्याने फिर्यादी लक्ष्मीकांत हरिभाऊ सुतार यांचे चुलते विनायक रामचंद्र सुतार, रा. ढवळेवाडी निंभोरे याने त्याच्या हातातील लाकडी कुर्हाडीच्या दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यावर डाव्या बाजूला मारून पाडले व हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ दमदाटी करीत असताना फिर्यादीचा लहान भाऊ गणेश हरीभाऊ सुतार हा भांडणे सोडविण्याकरीता गेला असता त्यास देखील हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार दाखल झाली आहे.
या प्रकरणी अधिक तपास सहा. पोलीस फौजदार हांगे व सहा. पोलीस फौजदार यादव करत आहेत.