स्थैर्य, बंगळुरू, दि.१७: बंगळुरू येथील बोमनहल्ली भागातील एसएनएन राज लेकव्यू अपार्टमेंटमध्ये 103 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या लोकांनी अपार्टमेंटमध्ये एक कार्यक्रम केला होता. त्यानंतर काही लोकांची तब्येत बिघडली आणि यामुळे सर्वांची टेस्ट करण्यात आली. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या लोकांमध्ये 96 जणांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे.
देशात मंगळवारी 11,573 नवीन रुग्ण आढळून आले तर 11,794 लोक बरे झाले. 99 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 1.09 कोटी लोक संक्रमित झाले असून 1.06 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. 1.56 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात आंदोलने, सभा, मिरवणुकांना मनाई; स्थानिक प्रशासनाला आदेश
लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, सभा-संमेलनांमधील उपस्थितीवर मर्यादा ठेवतानाच मास्क वापरणेही बंधनकारक आहे. कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करा. गर्दीवर नियंत्रण ठेवा. नियमांचे उल्लंघन केल्यास स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले आहेत.