स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१९: भारतीय
रेल्वेने आखलेल्या ‘नॅशनल रेल प्लॅन (एनआरपी) २०३०’ अंतर्गत रेल्वे
तिकिटांची प्रतीक्षा यादी संपविण्यात येणार असून, सर्व तिकिटे निश्चित
(कन्फर्म) करण्यात येणार आहेत. ‘एनआरपी २०३०’ ही योजना सार्वजनिक
सल्लामसलतीसाठी, तसेच विविध हितधारक आणि मंत्रालयाकडून अभिप्राय
मागविण्यासाठी सार्वजनिक करण्यात येणार आहे.
‘एनआरपी २०३०’मध्ये पायाभूत सुविधांची
उभारणी आणि महसूलनिर्मिती यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या
योजनेच्या अंमलबजावणीने रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ होईल. महसूलही वाढेल.
देशातील एकूण मालवाहतुकीत ४७ टक्के हिस्सेदारी मिळविण्याची रेल्वेची योजना
आहे.
रेल्वे आणखी चार समर्पित मालवाहतूक
कॉरिडॉर २०३० पर्यंत उभारणार आहे. नवे मालवाहतूक कॉरिडॉर सरकारी-खाजगी
भागीदारीत (पीपीपी) उभारले जातील. त्यामुळे रेल्वेचा मालवाहतूक काळ कमालीचा
कमी होईल. परिणामी मालवाहतुकीचे दर कमी करणे रेल्वेला शक्य होईल.