स्थैर्य, दि.२८: गाड्यांची नोंदणी करताना आता वाहन चाहकांना नॉमिनी अर्थात उत्तराधिकाऱ्याचे नाव देखील द्यावे लागू शकते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये प्रस्तावित दुरुस्तीबद्दल सामान्य लोकं आणि सर्व भागधारकांच्या सूचना तसंच टिप्पण्या मागवल्या आहेत.
केंद्राकडून मोटार वाहन नियम 1989 मध्ये दुरुस्ती करून वाहनाचा मालकी हक्क असणाऱ्या व्यक्तीच्या आरसीमध्ये नॉमिनीचे नाव दाखल करण्याबाबत नियम लागू करण्याचा विचार सुरू आहे.
याकरता मंत्रालयाने ड्राफ्ट नोटिफिकेशन देखील जारी केले आहे.
नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर मिळतील या सुविधा-वाहनांची नोंदणी करतानाच नॉमिनीचे नाव दाखल केले जावे अशी योजना आखली जाणार आहे. जर वाहन मालकाचा मृत्यू झाल्यास ती गाडी नॉमिनीकडे हस्तांतरित करणे आणि नोंदणी करणे सोपे जाईल.
मोटार नियमात दुरुस्ती केल्यास या तरतुदींवर परिणाम होईल – नियम 47 नुसार मोटार वाहनांच्या नोंदणीच्या अर्जात नवीन कलम जोडला जाईल. त्याअंतर्गत नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा भरण्याची व्यवस्था असेल. वाहन मालकाकडे कुणाला नॉमिनी निवडायचे असा पर्याय असेल.
नियम 55 आणि 56- मालकी हक्काचे हस्तांतरण असा अतिरिक्त क्लॉज जोडला जाईल. ज्याअंतर्गत नॉमिनीचे ओळखपत्र असल्यास ते मेन्शन केले जाईल. नियम 57- सार्वजनिक लिलावात खरेदी केलेल्या वाहनांचे हस्तांतरण – वाहनाच्या नोंदणी फॉर्ममध्ये अतिरिक्त कलम जोडले जाऊ शकते. ज्याअंतर्गत नॉमिनीच्या नावाचे तपशील देता येतील. वाहन मालकाच्या मृत्यूनंतर वाहन त्याच्याकडे हस्तांतरित करता येईल.