चतुर्थी’ या तिथीचे महत्त्व अन् गणेश पूजन आणि उपासना  यांसाठी निरनिराळ्या अवतारांतील त्याची नावे आणि कार्य !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.०२: मंगळवारी येणार्‍या चतुर्थीला अंगारकी म्हणतात. श्री गणेशाच्या उपासकांमध्ये अंगारक चतुर्थीला अधिक महत्त्व असते. अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी.श्री गणपतीचे पृथ्वीमाणेच मंगळावरसुद्धा आधिपत्य आहे. श्री गणपती आणि मंगळ यांचा रंगही एकच आहे.अंगारकीला गणेशाची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात, तसेच मंगळाकडून येणारी गणेश स्पंदनेही पृथ्वीवर येतात. यामुळे चंद्राकडून येणार्‍या लहरी जास्त प्रमाणात नष्ट होतात; म्हणूनच अंगारिका विनायकी आणि अंगारिका संकष्टी यांचे फळ वर्षभर केलेल्या अनुक्रमे विनायकी अन् संकष्टी यांच्याइतके आहे.
अंगारकी हे इतर व्रतांमाणे अहोरात्रीचे व्रत नाही. ते पंचहरात्मक व्रत आहे. दिवसाचे चार आणि रात्रीचा एक अशा पाच प्रहरांचे हे व्रत आहे. यात चंद्रोदयाला भोजन करावे असा विधी आहे; म्हणून ते जेवण म्हणजे पारणे नसून व्रतांगभोजन आहे.
कालमाहात्म्य – गणपतीच्या शुद्ध व वद्य चतुर्थी, म्हणजे विनायकी व संकष्टी चतुर्थी, या मंगळवारी आल्यास त्यांना ‘अंगारकी’ म्हणतात. एका अंगारकीने जे फळ मिळते, तसे वर्षभरच्या विनायकी किंवा संकष्टीने मिळते.
एखादे व्रत केल्यावर, त्याचे फळ अजून कसे मिळत नाही ?, म्हणून कोणी मनात विकल्प आणू नये. कोणाला लवकर, तर कोणाला उशिरा; पण फळ निश्चित मिळते. व्रताचे फळ प्रामुख्याने पुढील मुद्यांवर अवलंबून असते.
१. भक्तीभाव – व्रतामधे भक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे. भक्तीशिवाय केलेला व्रताचार एक यांत्रिक कर्म ठरते.
२. संकल्प – कोणतेही व्रत करताना त्याचा संकल्प करूनच ते व्रत करावे असे केल्याने आपल्याला त्याचा अनुभव येतो. संकल्प येत नसल्यास त्यासाठी जाणकार व्यक्तीचे सहाय्य घ्यावे.  संकल्पाने व्रत सिद्धीस जाते.
सूर्य आणि चंद्र यांच्या परिणामानुसार शास्त्रकारांनी प्रत्येक तिथीच्या देवता ठरवलेल्या असून ‘चतुर्थी’ या तिथीची देवता ‘श्री गणेश’ हि आहे !
‘ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्र यांनुसार सूर्य प्राणशक्तीचा, तर चंद्र मनःशक्तीचा कारक आहे. सूर्य आणि चंद्र यांच्यामुळे तिथी होतात. त्यांच्या भ्रमणामुळे निरनिराळे कोन होतात. अमावास्येला चंद्र सूर्यकक्षेत विलीन होतो. पौर्णिमेला दोघेही एकमेकांसमोर १८० अंशात क्षितिजावर दिसतात. अष्टमीला ते अर्ध समरेषेवर असतात. सूर्य आणि चंद्र यांच्या परिणामानुसार शास्त्रकारांनी प्रत्येक तिथीच्या देवता ठरवल्या आहेत.
त्यात ‘चतुर्थी’ या तिथीची देवता ‘श्री गणेश’ आहे; कारण तो विघ्न दूर करणारा आहे. आपल्या संस्कृतीत श्री गणेश आणि सरस्वती या दोन्ही देवतांचे ‘बुद्धीदायी देवता’ असे वर्णन केले आहे; परंतु दोन्ही देवतांची कार्ये भिन्न आहेत. गणेशाच्या कृपाप्रसादाने बुद्धी आणि ज्ञान वाढते, तर सरस्वतीच्या उपासनेने मिळालेले ज्ञान शब्दरूपात व्यक्त करता येते; म्हणून तिला ‘वाक्विलासिनी’, असे म्हटले आहे.
 डाव्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीविषयीची माहिती !
आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती कळल्यास त्या देवतेची भावपूर्ण उपासना करण्यास साहाय्य होते. सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची आपण उपासना करतो त्याची विविध प्रकारची माहिती ऐकलेली आहे. श्री गणेशाच्या डाव्या आणि उजव्या सोंडे विषयी माहिती जाणून घेऊया
उजवी सोंड : उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तीशाली असतो. तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही अर्थी उजव्या सोंडेचा गणपति ’जागृत’ आहे, असे म्हटले जाते. दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप-पुण्य यांची छाननी होते; म्हणून ती बाजू नकोशी वाटते. मृत्यूनंतर दक्षिणेकडे गेल्यावर जशी छाननी होते, तशी छाननी मृत्यू अगोदर दक्षिणेकडे तोंड करून बसल्यास (किंवा झोपतांना दक्षिणेकडे पाय केल्यास) व्हायला लागते. दक्षिणाभिमुखी मूर्तीची पूजा नेहमीसारखी केली जात नाही; कारण दक्षिणेकडून तिर्यक (रज-तम) लहरी येतात. अशा मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून केली जाते. त्यामुळे सात्त्विकता वाढते आणि दक्षिणेकडून येणार्‍या रज-तम लहरींचा त्रास होत नाही.
डावी सोंड : डाव्या सोंडेचा गणपति म्हणजे वाममुखी गणपति. वाम म्हणजे डावी दिशा किंवा उत्तर बाजू. डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे, ती शीतलता देते. तसेच उत्तर बाजू अध्यात्माला पूरक आहे, आनंददायी आहे; म्हणून बहुधा वाममुखी गणपति पूजेत ठेवतात. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.
वक्रतुंड : सर्वसाधारणतः ‘वक्रतुंड’ म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा, असा अर्थ समजला जातो; पण हा अर्थ योग्य नाही. ‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्डः ।’, म्हणजे ‘वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे आणि बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो, तो वक्रतुंड.’ तिर्यक (रज-तम) आणि विस्फुटित (तम-रज), म्हणजे वाकड्या, रज-तमात्मक 360 लहरींना सोंडेच्या माध्यमातून108 लहरींप्रमाणे सरळ, सात्त्विक करतो, तो वक्रतुंड. (27 नक्षत्रांपासून निघालेल्या  27 लहरींचे अजानजलोकात प्रत्येकी चार चरण (विभाग) होऊन पृथ्वीवर 27 गुणीले 4 = 108 लहरी येतात. शेषापासून निघणार्‍या लहरींना ‘हिरण्यगर्भलहरी’ म्हणतात. त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आल्या की, त्यांची संख्या 360 होत असल्यामुळे त्यांना ‘360 लहरी’ असे म्हणतात.)
श्री सिद्धीविनायक : उजव्या सोंडेच्या गणपतीला सामान्यतः ‘सिद्धीविनायक’ म्हणतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, म्हणजेच गणेश चतुर्थीला ‘सिद्धीविनायकाचे व्रत’ करतात; पण सर्वच गणेशमूर्ती उजव्या सोंडेच्या नसतात; किंबहुना या दिवशी सर्वसामान्य माणसे ज्या पार्थिव (मातीच्या) मूर्तीची पूजा करतात, तो उजव्या सोंडेचा नसतोच. त्याचप्रमाणे जोडीला शक्ती किंवा सिद्धीही नसते. असे असले, तरी हे व्रत ‘सिद्धीविनायकाचे व्रत’ म्हणूनच केले जाते; कारण त्या दिवशी पूजनीय ध्यान पुढीलप्रमाणे असते.
     एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजम् ।
     पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ॥
अर्थ : एक दात (पूर्ण) असलेला, सुपासारखे कान असलेला, हत्तीचे तोंड असलेला, चार हात असलेला आणि पाश अन् अंकुश धारण करणारा अशा सिद्धीविनायकाचे ध्यान करावे.
सिद्धीविनायकाचे हे स्वरूप सर्वप्रचलीत आहे. या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून, त्याची 21 नावे उच्चारून 21 प्रकारची पत्री वहातात. (दैवतशास्त्र आणि मंत्रशास्त्र यांप्रमाणे 1, 3, 7, 11, आणि 21 हे अंक महत्त्वाचे आहेत. त्यांच्यापैकी 1, 3, 7 आणि 21 हे अंक श्रीगणेशाला प्रिय आहेत. यातील 1,3, आणि 7 हे अविभाज्य अंक आहेत आणि त्यांचा गुणाकार 21 आहे.)
 सिद्धीविनायकाचे वर्णन : सिद्धीविनायक चार हातांचा, त्रिनेत्र, गजमुख आणि त्याचा रंग पद्मराग मण्याप्रमाणे म्हणजे माणकाप्रमाणे असतो. प्रातःकाळी क्षितिजावर प्रकटणारे सूर्यबिंब अत्यंत तेजस्वी, किरणरहित आणि भडक तांबड्या रंगाचे असते. हा रंग श्री गणपतीचा असतो ! सूर्यकोटिसमप्रभ (येथे ‘कोटि’ हा शब्द संख्यात्मक 1,00,00,000 (107) असा नसून ‘सूर्याप्रमाणे’ असा आहे.) या श्री गणेशाजवळ सिद्धी आणि बुद्धी (किंवा ऋद्धी) असतात. तो कुंकुमार्चित असतो आणि त्याची मनोवेधक सोंड उजव्या स्तनाजवळ वळलेली असते.
 गणपतीची सोंड उजव्या बाजूला असणे : रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीमध्ये प्रगट शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत असल्याचे हे द्योतक आहे. ही प्रगट शक्ती श्रीविष्णूच्या धर्मसंस्थापनेच्या कार्याला साहाय्य करणार आहे.
संकलक – श्री. हिरालाल तिवारी
सौजन्य – सनातन संस्था,
संपर्क क्रमांक  – 9975592859

Back to top button
Don`t copy text!