गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


बारामती येथे उपमुख्यमंत्र्यांकडून विकासकामांचाही आढावा

स्थैर्य, बारामती दि. 5 : बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती  येथील विद्या प्रतिष्‍ठानच्या व्हीआयटी हॉल येथे ‘कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन‘ व ‘विकास कामांबाबत आढावा बैठक‘ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला नगराध्यक्ष पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी  उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. रूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणी संख्या वाढवावी. कोविड आणि नॉन कोविड रूग्ण या दोघांनाही वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने याची खबरदारी घेण्याचे तसेच नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. कोविडशी लढण्याकरिता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या आर्थिक वर्षामध्ये ज्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, त्याकरिता मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वेळेत पूर्णपणे वापर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केल्या.

यावेळी  उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी तांदूळवाङी येथील पिण्‍याच्‍या पाण्याचा तलाव व सुरु आसलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. बारामती तालुक्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत याची खबरदारी पोलीस विभागाने घ्यावी, अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या कडक सूचना त्‍यांनी यावेळी पोलिसांना दिल्या. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!