तालुक्यातील सर्व गावात वनीकरणाच्या बाबतीत बिहार पॅटर्न राबवा; फलटण पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यातील 128 गावांमध्ये बिहार पॅटर्न पद्धतीने विविध प्रकारची झाडे लावून वनीकरणाच्या बाबतीतला बिहार पॅटर्न फलटण तालुक्यामध्ये यशस्वीरित्या राबवावा. यासाठी सर्वच्या सर्व ग्रामसेवक व ग्राम विस्तार अधिकारी यांना पंचायत समितीतून योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी फलटण पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये माजी सभापती व विद्यमान सदस्या सौ. रेश्माताई भोसले यांनी केल्यानंतर या मागणीला सर्व सदस्यांनी पाठिंबा दर्शविला व फलटण तालुका हा वनीकरणाच्या बाबतीत परिपूर्ण होण्यासाठी फलटण तालुक्यामध्ये बिहार पॅटर्न अंमलबजावणी योग्यरीत्या करणे गरजेचे आहे, असेही मत सर्व सदस्यांनी मांडले. यावर गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी फलटण तालुक्यामध्ये वनीकरणाच्या बाबतीत बिहार पॅटर्न राबवण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शन सूचना सर्व ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांना पंचायत समिती स्तरावरून देण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

फलटण पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमधील सभागृहामध्ये उपसभापती सौ. रेखाताई खरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे माजी सभापती व विद्यमान सदस्य सौ. रेश्मा भोसले, सौ. प्रतिभा धुमाळ, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, संजय कापसे, संजय सोडमिसे, सौ. जयश्री आगवणे यांच्यासह इतर सदस्य व अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

फलटण तालुक्यामधील खरीप व रब्बी हंगामाबाबत तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना सविस्तर माहिती दिली व सद्यस्थितीत कृषी विभागामार्फत कोणकोणत्या योजना फलटण तालुक्यामध्ये राबविल्या जातात याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य सौ. रेश्मा भोसले यांनी फलटण तालुक्यामध्ये लष्करी आळी बाबत शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे मदत केली जाते व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते का ? असा सवाल उपस्थित केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी कृषी सहाय्यकांना मार्फत ज्या-त्या विभागांमध्ये लष्करी आळी बाबत शेतकऱ्यांमधून जनजागृती करण्याचे काम कृषी विभागाने केले आहे व आगामी काळातही प्रसिद्धी पत्रके व भित्तीपत्रके यांच्यामार्फत तालुक्याच्या प्रत्येक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या जनजागृतीसाठी कृषी विभाग कार्यरत राहणार आहे, अशी ग्वाही तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या फलटण बसस्थानकाचा आढावा घेत असताना फलटण पंचायत समितीचे सदस्य सचिन रणवरे यांनी फलटण बसस्थानकाची नूतनीकरणाचे काम सद्यस्थितीमध्ये पूर्ण करून घ्यावे. सध्या कोरोनाच्या काळामध्ये बसस्थानक नूतनीकरणाचे काम जर पूर्ण करून घेतले, तर संपूर्ण बसेस पूर्ण ताकतीने चालू झाल्यानंतर प्रवाश्यांना ते सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे आपल्या महामंडळाच्या माध्यमातून बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केल्यानंतर फलटण बसस्थानकाचे डेपो मॅनेजर राहुल कुंभार यांनी आगामी काळामध्ये आमच्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन लवकरात लवकर फलटण बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येईल, अशी ग्वाही सभागृहाला दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत फलटण तालुक्यामध्ये सध्या स्थिती मध्ये कोणकोणती विकास कामे सुरू आहेत याबद्दलची सविस्तर माहिती सुनील गरुड यांनी सभागृहाला दिली.

संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये कोरोना या महाभयंकर आजाराने आपले हातपाय पसरले असून फलटण तालुक्यातील कोरोना बाबतची सद्यस्थिती काय आहे. फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचे कोण कोणत्या गावांमध्ये रुग्ण आढळत आहेत. फलटण तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांवर आता होम आयसोलेशन द्वारे उपचार सुरू असून फलटण तालुक्यासाठी दीड हजार अँटी जेन टेस्ट किट उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या टेस्ट या लवकर होत असून त्याचे अहवालही त्वरित उपलब्ध होत आहेत. आता फलटण तालुक्यातील कोरोना साखळी शोधून काढण्यासाठी याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे. गिरवी येथील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सद्यस्थितीला कित्येक वर्षे पडून आहे, तरी ती इमारत मूळ मालकाने कायदेशीर नोटीसद्वारे पुन्हा मागितली असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांनी स्पष्ट केले.

फलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधील विविध शिक्षकांच्या बदल्या झालेल्या असून काही शिक्षक जिल्ह्यात तर काही शिक्षक पर जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात आलेले आहेत, अशी माहिती तालुका शिक्षण अधिकारी गंबरे यांनी सभागृहाला दिली.

फलटण पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक सदस्य सचिन रणवरे यांनी केले तर आभारही सदस्य सचिन रणवरे यांनी मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!