दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२३ । फलटण । महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांची जन्मभूमी आणि महानुभाव पंथाची दक्षिण काशी संबोधण्यात येत असलेल्या फलटण नगरीत या पंथीयांसाठी स्वतंत्र दफनभूमी नसल्याचे समोर येताच त्यासाठी तातडीने शासकीय जागा उपलब्ध करुन देण्याचे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या आषाढी वारीनिमित्त सातारा जिल्ह्यातील पालखी राष्ट्रीय महामार्ग, पालखी तळ, विसाव्याची ठिकाणे आणि वीज, पाणी, आरोग्य, सुरक्षा या बाबींच्या व्यवस्थे विषयी माहिती घेऊन पाहणी करण्यासाठी येथे आलेल्या ना. विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या सुरवडी, ता. फलटण येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी महंत नरेंद्र शास्त्री यांनी त्यांची भेट घेऊन दफनभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. त्याबाबत सविस्तर निवेदन त्यांना दिले.
ना. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना याबाबत माहिती देवून सदर विषय तातडीने मार्गी लावण्याची सूचना केली. जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन नरेंद्र शास्त्री यांना दिले आहे.