दैनिक स्थैर्य | दि. १ मार्च २०२३ | फलटण |
ऊस वाहतूकदारांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असून त्यांच्याकडून ऊसतोड मुकादम, टोळ्यांकडून मोठ्या प्रमाणावर लाखो रुपयांची उचल घेतली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. अशा फसवणूक केलेल्या ऊसतोड टोळ्या, मुकादमांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत व त्यांना पोलीस यंत्रणेने अटक करावी, या मागणीसाठी पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून आज फलटण उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर, कोल्हापूर व सातारा जिल्हा ऊस वाहतूकदार, सोलापूर जिल्हा जनसंपर्क प्रमुख प्रकाश चौगुले, सोलापूर जिल्हा सचिव जिवराज गुंड, सोलापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष रावसाहेब चौगुले, सातारा जिल्हा सचिव राजाराम भोसले साहेब, माढा तालुका अध्यक्ष दिनेश भांगे, मोहोळ तालुकाध्यक्ष अशोक मसुगडे, व भटके विमुक्त हक्क परिषद संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आर. डी. पवार आणि इतर पदाधिकारी, मानव अधिकार संरक्षण समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष नागेश जाधव, पुणे जिल्हा महिला सचिव सपना शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी याप्रसंगी उपस्थित होते.