सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या ‘लेटर पॅड’वर भाजप नेत्याची छबी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२३ | वडूज | मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणार्‍या शिवसेनेची सहा महिन्यांपूर्वी दोन शकले झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाच्या सातारा जिल्ह्यातील एका विभाग प्रमुखाने आपल्या ‘लेटर पॅड’वर चक्क भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची छबी छापल्यामुळे तो एक चर्चेचा विषय झालेला आहे.

दुष्काळी भागातील शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटाकडे धाव घेतलेले सातारा जिल्ह्यातील पळसगाव, ता. खटाव येथील जिल्हा परिषदेचे निमसोड व औंध गट विभागप्रमुख श्री. हणमंत घाडगे यांनी आपल्या ‘लेटर पॅड’वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची छबी छापून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

श्री. घाडगे हे ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून या परिसरात प्रसिद्ध आहेत. गेली चाळीस वर्षे ते शिवसेनेशी एकनिष्ठ होते; परंतु त्यांची फारशी दखल शिवसेनेने घेतली नाही. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या ‘लेटर पॅड’वर शिवसेनेच्या नेत्यांची छबी ठीक आहे; परंतु भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची छबी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटाच्या राजकीय प्रवासाचे शेवटचे स्टेशन हे भाजप तर नव्हे ना? अशी शंका आता राजकीय विरोधक विनोदाने करू लागले आहेत. त्यामुळे श्री. हणमंत घाडगे यांचे ’लेटर पॅड’ संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे.


Back to top button
Don`t copy text!