अवैध मच्छिमार बोटी जप्त करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२३ । मुंबई । अवैध मच्छिमारी करणाऱ्यांच्या नावा (बोटी) जप्त करून सरकारजमा केल्या जातील. तसेच अवैध मच्छिमारीला मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल, अशी घोषणा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.

मच्छ‍िमारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुंबई येथे विविध मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार रमेश पाटील यांच्यासह चेतन पाटील, लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, राजन मेहेर, ज्योती मेहेर आदी मच्छिमार नेते उपस्थित होते.

कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी पावसाळ्यातील सागरी मासेमारी बंदी झुगारून काही मच्छिमार सागरी मासेमारी करीत असल्याची तक्रार उपस्थित मच्छिमार बांधवांनी केली तेव्हा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अवैध मासेमारी थांबविण्यासाठी पोलिस खात्याची मदत घेण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बोलतांना मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, अवैध मासेमारीला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. या क्षेत्रात जर गैरव्यवहाराच्या तक्रारी असतील, तर मच्छिमार बांधवांनीच हा गैरव्यवहार थांबविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. शासन मच्छिमार बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मत्स्यव्यवसाय विभागातील गैरव्यवहाराच्या तक्रारींसाठी एक स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक जारी केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी उपस्थित मच्छिमार संघटनांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांची दखल घेऊन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी तत्परतेने प्रशासन यंत्रणेस निर्देश दिल्याबद्दल उपस्थित मच्छिमार बांधवांनी समाधान व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!