दैनिक स्थैर्य । दि. 10 जानेवारी 2022 । फलटण । सामाजिक कार्य करताना चिकाटी धैर्य व आपले ध्येय समोर ठेवल्यास यशाचे शिखर निश्चित गाठता येते असे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डाॅ. सौ. वीणाताई पंडित यांनी स्पष्ट केले.
फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालय अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, शाखा फलटण मार्फत शारदा पुरस्कार या वर्षी सौ. वीणाताई पंडित यांना जाहीर करण्यात आलेला होता. त्यावेळी सौ. पंडित बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. शिल्पा इनामदार व प्रमुख अतिथी सौ. चारुलता उपळेकर या होत्या.
मी माझ्या दवाखान्यात रुग्णांची सेवा करताना ग्रामीण भागातील रुग्ण माझ्याशी विज, गँस, शेती या बाबतच्या अडचणी सांगत अशा वेळी मी त्यांच्या समस्या ग्रामपंचायतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोडविण्याचा प्रयत्न केला. या कार्यात मला माझ्या कुटुंबीयांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. या कार्याबद्दल मला राष्ट्रपती पुरस्काराचा मान मिळाला परंतु केवळ पुरस्कार मिळविणे ध्येय नव्हते. समाजात वावरताना कायम सामाजिक कार्याचे ध्येय असावे. यातून उत्तम समाज घडताना आपणास पहावयास मिळते, असे सौ. विणा पंडीत यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भगवान श्री परशुराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर अनिरुध्द रानडे यांनी सर्वांचे स्वागत करुन या संस्थेमार्फत वर्षभरात सार्वजनिक मौजीबंधन, गीताजयंती, श्री परशुराम पुरस्कार, शिष्यवृत्ती कार्यक्रम, मोफत वारकरी तपासणी यासह इतर कार्यक्रमाचा आढावा घेतला.
यावेळी सौ. विणा पंडीत यांना लेले कुटुंबीयांकडून दिला जाणारा शारदा पुरस्कार, स्मृतीचिन्ह, ५००१ रोख, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेस भरघोस मदत करणारे व मान्यवरांचा सत्कार करण्यास आला. सुत्रसंचालन सौ. माधुरी दाणी यांनी व आभार केंद्रप्रमुख विजय ताथवडकर यांनी मानले. या कार्यक्रमास संस्था पदाधिकारी, सभासद व निमंत्रित मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.